Yuzvendra Chahal Retirement Comment: भारताचे अनुभवी स्पिनर युझवेंद्र चहल गेल्या अनेक वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याने टी २० वर्ल्डकप २०२४ मध्ये भारतीय संघाकडून सहभाग नोंदवला होता. मात्र त्याला या स्पर्धेत एकही सामना खेळायला मिळाला नाही. चहलने ऑगस्ट २०२३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीवर बोलताना युझवेंद्र चहलने आपली कारकीर्द, ट्रोलिंग आणि टीम इंडिया याबाबत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. याचबरोबर युझवेंद्र चहलनं आपल्या निवृत्तीबाबत देखील मोठे वक्तव्य केलं. चहलची ही वक्तव्यावरून तो सकारात्मक वाटला.
३५ वर्षाच्या युझवेंद्र चहलने सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही. मात्र ज्यावेळी लोक कुणा दुसऱ्याचं नाव जोडून वैयक्तिक गोष्टींची चर्चा करतात त्यावेळी वेदन होतात. चहलच्या मते तो अशा गोष्टींना जास्त महत्व देत नाही. त्यांचा फोकस हा क्रिकेट खेळण्यावर जास्त असतो.
दरम्यान, दीर्घ काळापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळं त्याच्या निवृत्तीच्या अफवा वेळोवेळी पसरत असतात. त्यावर युझवेंद्र चहलने तो अजून ५ ते ६ वर्षे क्रिकेट खेळणार असल्याचं सांगितलं. त्याच्या मजे जोपर्यंत मैदानावर खेळताना आनंद मिळतोय आणि खेळण्याची पॅशन आहे तोपर्यंत तो क्रिकेट खेळणार आहे.
युझीने आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२६ बद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. चहल टीम इंडियाबाबत म्हणाला, 'भारताला फक्त भारतच हरवू शकतो. कोणत्याही दुसऱ्या संघाकडे भारताला हरवण्याची क्षमता नाही. भारतीय संघात अनुभव आणि तरूण खेळाडूंचे योग्य संतुलन आहे.' युझीने जसप्रीत बुमराहला जगातील एक नंबरचा वेगवान गोलंदाज असं संबोधलं असून हार्दिक पांड्या हा संघातील सर्वात महत्वाचा अष्टपैलू खेळाडू असल्याचं मत व्यक्त केलं. चहलने तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा हे आक्रमक शैलीचे खेळाडू आहेत असंही सांगितलं.
युझवेंद्र चहलच्या मते प्रत्येक खेळाडूची वेळ येत जात असते. रोहित शर्मा आणि विराट कोहली टी २० संघात नसले तरी टीम इंडियाने टी २० क्रिकेटमध्ये चांगली लय दाखवली आहे. याचं कारण म्हणजे संघात हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव सारखे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांनी टीमला सांभाळून घेतलं आहे.
युझवेंद्र म्हणाला की, कॅप्टन्सीनं जास्त फरक पडत नाही. खेळाडूंना आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यांनी टीम इंडियाने काही खेळपट्टींवर तीन फिरकीपटू उतरवावेत असा सल्ला देखील दिला आहे. खासकरून पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात ही रणनिती यशस्वी ठरण्याची शक्यता आहे. चहलने शिवम दुबेला टीम इंडियाचा अनसंग हिरो म्हटलं. तो जास्त प्रकाशझोतात नसतो. मात्र बॅट आणि बॉलनं तो आपलं काम करून जातो.