स्पोर्ट्स

Yuzvendra Chahal : "मी २६ दिवस रिहॅब सेंटरमध्ये होतो..."; युझवेंद्र चहलचा दारूच्‍या व्यसनाबद्दल मोठा खुलासा

Yuzvendra Chahal rehab alcohol addiction : पॉडकास्टमध्ये मानसिक आरोग्याबाबतही केले महत्त्‍वपूर्ण भाष्‍य

पुढारी वृत्तसेवा

Yuzvendra Chahal rehab alcohol addiction : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू युझवेंद्र चहलने वैयक्तिक आयुष्यातील वादळ, घटस्फोटाचे नैराश्य आणि दारूच्या व्यसनाबाबत अत्यंत मनमोकळेपणाने मोठा खुलासा केला आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या ‘बॅथ अँड बोल’ या पॉडकास्टमध्ये बोलताना चहलने ही कबुली दिली. व्यसन नियंत्रणाबाहेर गेल्याचे लक्षात आल्यानंतर आपण स्वतःहून व्यावसायिक मदत घेतल्याचे त्याने स्पष्ट केले.

घटस्फोटानंतर वाढले दारुचे व्यसन

चहल म्हणाला की, आयपीएलच्या सुरुवातीच्या दिवसांत पार्ट्यांमध्ये मद्यपान करणे ही एक साधी गोष्ट होती; मात्र गेल्या वर्षी घटस्फोट झाल्यानंतर ही सवय हाताबाहेर गेली. वैयक्तिक आयुष्यातील नैराश्य आणि मानसिक ताणतणावामुळे मद्यपानाचे प्रमाण वाढले होते, असे त्याने सांगितले. या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी त्याने तब्बल २६ दिवस रिहॅब सेंटरमध्ये घालवले, अशी कबुलीही त्‍याने दिली.

मी एका रिहॅब सेंटरमध्ये २६ दिवस राहिलो...

“मी एका रिहॅब सेंटरमध्ये २६ दिवस राहिलो. आता मद्यपानावर नियंत्रण कसे ठेवावे, काय करावे हे मला समजले आहे. यामुळे माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला. वैयक्तिक आयुष्यातही मी आता गोष्टी अधिक समजूतदारपणे हाताळतो. माझ्या भावनांवर आता माझे नियंत्रण आले आहे.”

कोरिओग्राफर धनश्री वर्माबरोबर झाला होता विवाह

डिसेंबर २०२२ मध्ये कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी विवाह करणारा चहल जून २०२२ पासून स्वतंत्र राहत होता. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टाने दोघांना परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर केला होता.

मद्यपानामुळे वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त

मद्यपानामुळे आपल्या क्रिकेटवर फारसा परिणाम झाला नाही, असे सांगताना त्याने वैयक्तिक आयुष्य मात्र उद्ध्वस्त झाल्याची कबुली दिली. माझ्या क्रिकेटवर याचा फारसा परिणाम झाला नाही, पण माझे वैयक्तिक आयुष्य यामुळे खूप उद्ध्वस्त झाले. त्यानंतर मात्र भूतकाळ मागे सोडण्याचा निर्णय घेतला. आता मी आनंदी आहे, आयुष्य जगतोय, गोगार्टिंग आणि गोल्फ खेळतोय. आता मी खूप चांगल्या स्थितीत आहे.”

एबी डिव्हिलियर्सचा सल्‍ला ठरला मोलाचा

आयपीएल सुरू झाल्यानंतर आम्ही सलग तीन वर्षे तुफान पार्ट्या केल्या होत्या. मात्र, घटस्फोटानंतर जेव्हा मानसिक स्थिती खालावली आणि व्यसन ओलांडून पुढे गेले, तेव्हा मला जाणीव झाली की, असेच सुरू राहिले, तर माझ्‍यातील क्रिकेटच संपून जाईल. अशा कठीण प्रसंगात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) माजी सहकारी एबी डिव्हिलियर्स याने आयुष्यात समतोल कसा राखायचा, याबाबत मोलाचा सल्ला दिल्याचेही त्याने आवर्जून सांगितले.

अस्वस्थतेसह पॅनिक्स अटॅकचाही करावा लागायचा सामना

“अँग्झायटी (अस्वस्थता) अशी असते की आतून तुमचे हृदय खूप वेगाने धडकू लागते. पॅनिक्स अटॅक आल्यावर माझा चेहरा आकुंचन पावल्यासारखा व्हायचा, मला बोलताही येत नव्हते. ओठ इतके घट्ट आणि एका बाजूला ओढले जायचे की समोरच्याला लगेच समजायचे की काहीतरी गडबड आहे,” अशी कबुलीही त्‍याने दिली.

आता नव्‍याने सारं काही पाहायचं....

“जेव्हा तुम्ही सार्वजनिक व्यक्ती असता, तेव्हा तुम्ही नकळत प्रत्येकाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर ताशेरे ओढण्याचे आमंत्रण देत असता. सोशल मीडियावरील लोकांना आपण कधीही बोलण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळे सर्व काही मागे सोडून नवीन सुरुवातीकडे पाहायचे असते,” असा विश्‍वासही चहलने व्‍यक्‍त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT