नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि अभिनेते योगराज सिंग पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत सापडले आहेत. एका वेब सीरिजमधील संवादादरम्यान महिलांबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक टिप्पणी केल्याच्या आरोपावरून चंदीगड पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वृत्तसंस्था 'एएनआय'ने गुरुवारी (दि. १४) यासंदर्भातील माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सोशल मीडियावर एका वेब सीरिजमधील व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही क्लिप 'लुख्खे' (Lukkhe) या हिंदी वेब सीरिजमधील एका भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या दृश्यात योगराज सिंग यांचे पात्र एका पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिसते. याच संवादादरम्यान त्यांनी महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधाने केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या व्हिडिओवरून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत चंदीगडमधील सेक्टर ३६ पोलीस ठाण्यात योगराज सिंग यांच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७९ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act), २००० च्या कलम ६२-अ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून व्हायरल क्लिपची सत्यता पडताळली जात आहे.
भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडील असलेले योगराज यांचा वादांशी जुना संबंध आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा सार्वजनिक व्यासपीठांवरून वादग्रस्त विधाने केली आहेत. चालू वर्षाच्या मार्च महिन्यात एका मुलाखतीत त्यांनी खेळाडूंची निवृत्ती आणि कुटुंबातील महिलांच्या भूमिकेवर भाष्य करताना म्हटले होते की, ‘‘घरातील स्त्रिया किंवा पत्नी खेळाडूंना निवृत्त होण्यासाठी आणि मुलांकडे लक्ष देण्यासाठी गळ घालतात. खेळाडूंच्या कारकिर्दीत महिलांनी हस्तक्षेप करू नये, असे माझे मत आहे. फकीर आणि खेळाडू यांचा कोणताही धर्म किंवा वर्ग नसतो, ते देवाचे स्वरूप असतात.’’
त्याच मुलाखतीत त्यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीच्या चर्चेवरही कडक शब्दांत टीका केली होती. ‘’रोहित शर्मा आणि विराट कोहली हे अजूनही तरुण आहेत आणि ते निवृत्तीचा विचार करत आहेत, हे ऐकून खेद वाटतो. तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, याची जाणीव जगाला करून द्या. वय पन्नास असले तरीही जर तुम्ही द्विशतक झळकावत असाल, तर कोणीही तुम्हाला संघातून बाहेर काढू शकत नाही. आपल्या देशात वयाचा हा मुद्दा अत्यंत विनोदी पद्धतीने हाताळला जातो,’’ असे विधान त्यांनी केले होते.