Betting App Case
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. उथप्पाला २२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील ईडी मुख्यालयात आणि युवराजला २३ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
ऑनलाइन सट्टेबाजी ॲपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी दोघांनाही नोटीस बजावली आहे. उथप्पा सध्या आशिया कप २०२५ च्या समालोचन (कॉमेंट्री) संघाचा भाग आहेत. या प्रकरणात आतापर्यंत चार माजी भारतीय क्रिकेटपटूंना चौकशीसाठी बोलावले गेले असून, याआधी सुरेश रैना आणि शिखर धवन यांची ईडीने चौकशी केली होती.
ईडीला चौकशीदरम्यान, क्रिकेटपटूंची 1xBet नावाच्या सट्टेबाजी ॲपशी काय भूमिका होती किंवा त्यांचे या ॲपशी काय संबंध होते, हे जाणून घ्यायचे आहे. ईडी या गोष्टीची चौकशी करत आहे की युवराज किंवा उथप्पा यांनी या बेटिंग ॲपच्या जाहिरातीत आपली प्रतिमा वापरू दिली का आणि त्याबदल्यात कोणतेही आर्थिक व्यवहार झाले का, याची चौकशी केली जात आहे.
या प्रकरणात सोमवारी माजी तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांचाही जबाब नोंदवला गेला. आज (दि. १६) बंगाली अभिनेता अंकुश हाजरा यांनीही या प्रकरणी ईडीसमोर हजर होऊन आपला जबाब नोंदवला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्याचे वकील शशी कौशिक यांनी सांगितले की, "ईडीने बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींना समन्स बजावले आहे. हा नियमित चौकशीचा भाग आहे." दरम्यान, 1xBet ची इंडिया ब्रँड ॲम्बेसेडर असलेली अभिनेत्री उर्वशी रौतेला अद्याप चौकशीसाठी हजर झालेली नाही.
बेकायदेशीर बेटिंग अॅप 1xBet प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला २४ सप्टेंबर रोजी दिल्लीतील त्यांच्या मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.