Shubman Gill | युवीकडून गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप; म्हणाला, "ही कामगिरी अविश्वसनीय! Pudhari File Photo
स्पोर्ट्स

Yuvraj Singh | युवीकडून गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप; म्हणाला, "ही कामगिरी अविश्वसनीय!

गिलने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारून चार शतके झळकावली

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने युवा कर्णधार शुभमन गिलच्या इंग्लंड दौर्‍यातील कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले आहे. परदेशातील कामगिरीवर प्रश्नचिन्ह असतानाही गिलने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारून चार शतके झळकावली, हे अविश्वसनीय असल्याचे मत युवराजने व्यक्त केले.

नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौर्‍यात भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांसारख्या अनुभवी खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गिलच्या नेतृत्वाखालील युवा संघाने ही कामगिरी केली. या मालिकेत गिलने चार शतकांसह 754 धावा केल्या. सेना देशांमध्ये एका कसोटी मालिकेत 700 हून अधिक धावा करणारा तो पहिला आशियाई फलंदाज ठरला. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना युवराज म्हणाला, गिलच्या परदेशातील रेकॉर्डवर अनेक प्रश्न होते; पण त्या युवा खेळाडूने कर्णधारपद स्वीकारले आणि चार कसोटी शतके झळकावली. जेव्हा तुमच्यावर जबाबदारी येते, तेव्हा तुम्ही ती कशी स्वीकारता हे महत्त्वाचे असते. गिलने ते करून दाखवले.

मालिका बरोबरीत हादेखील भारताचा विजयच!

युवराज पुढे म्हणाला, विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांची जागा घेणे सोपे नसते; पण या युवा संघाने हे आव्हान स्वीकारले. त्यामुळे ही मालिका बरोबरीत सुटली असली, तरी माझ्यासाठी हा एक विजय आहे. युवराजने गिलला यापूर्वी मार्गदर्शनही केले आहे.

रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदरवरही स्तुतिसुमने

यावेळी युवराजने अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या योगदानाचेही कौतुक केले. तो म्हणाला, मँचेस्टर कसोटीत जडेजा आणि सुंदरने शतकी खेळी करून सामना अनिर्णीत राखला. जडेजा अनुभवी आहे; पण वॉशिंग्टन सुंदरसारख्या युवा खेळाडूने संघासाठी दिलेले योगदान अविश्वसनीय होते. या कामगिरीमुळे भारतीय संघाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT