11 व्या मानांकित निकोला-राजीव यांच्याविरुद्ध पिछाडी भरून काढत विजयश्री
आता उपांत्य फेरीत नील-जो या ब्रिटिश जोडीचे आव्हान
स्पर्धेतील अन्य भारतीयांचे आव्हान मात्र प्रारंभिक टप्प्यातच संपुष्टात
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
भारताचा युवा टेनिसपटू युकी भांबरी आणि त्याचा न्यूझीलंडचा जोडीदार मायकेल व्हिनस यांनी अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅमच्या पुरुष दुहेरीत उपांत्य फेरीत ऐतिहासिक धडक मारली. या इंडो-न्यूझीलंड जोडीने उपांत्यपूर्व फेरीत 11 व्या मानांकित निकोला मेक्टिक आणि राजीव राम यांचा 6-3, 7-6, 6-3 असा पराभव करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आता उपांत्य फेरीत त्यांची लढत ब्रिटिश टेनिसपटू नील स्कुप्स्की आणि जो सॅलिसबरी यांच्याशी होणार आहे.
जागतिक क्रमवारीत 32 व्या स्थानी असलेला भारताचा अव्वल दुहेरी खेळाडू भांबरी त्याच्या कारकिर्दीत प्रथमच ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीत खेळेल, हे यामुळे स्पष्ट झाले. गतवर्षी भांबरीने फ्रेंच टेनिसपटू अल्बानो ऑलिवेट्टीसोबत यूएस ओपनमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांनी उप-उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, त्यावेळी त्यांना स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्स आणि अर्जेंटिनाच्या होरासिओ जेबालोस यांच्याकडून सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला होता.
या स्पर्धेच्या सुरुवातीला भांबरी आणि व्हिनस यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी कोलंबियाचा गोंझालो एस्कोबार आणि मेक्सिकोचा मिगुएल एंजेल रेयेस-व्हारेला या बिगर मानांकित जोडीचा 6-1, 7-5 असा पराभव केला होता. यानंतर, त्यांनी 11 व्या मानांकित राजीव राम आणि निकोला मेक्टिक यांचे आव्हान मोडीत काढले. त्यापूर्वी, राम आणि मेक्टिक यांनी ब्राझीलचा फर्नांडो रोंबोली आणि ब्रिटनचा जॉन-पॅट्रिक स्मिथ यांच्या बिगर मानांकित संघाचा 6-7 (7), 7-5, 7-5 अशा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
विशेष म्हणजे, दुसर्या फेरीतील तो रामसाठी कारकिर्दीतील 500 वा विजय ठरला होता. याआधी, भारताचा अनुभवी खेळाडू रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार रोमेन अर्नेडो यांना शनिवारी पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागलेे. तसेच, अर्जुन कढे आणि इक्वाडोरच्या डिएगो हिडाल्गो यांनाही पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. रविवारी, अनिरुद्ध चंद्रशेखर आणि विजय सुंदर प्रशांत यांचा प्रवास ब्राझीलचा फर्नांडो रोंबोली आणि ऑस्ट्रेलियाचा जॉन-पॅट्रिक स्मिथ यांच्याकडून 6-4, 6-3 अशा पराभवानंतर संपुष्टात आला होता.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अमेरिकन टेनिसचा थरार अनुभवताना दिसला. जोकोव्हिच-टेलर फ्रिट्झ यांच्यातील पुरुष एकेरी उपांत्यपूर्व सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये तो उपस्थित होता. त्याचे जवळचे मित्र हितेश संघवी आणि राजीव शर्मा त्याच्या समवेत होते.
या स्पर्धेच्या पुरुष एकेरीत गतविजेता जानिक सिन्नरने यूएस ओपनचे विजेतेपद कायम राखण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्याने आपलाच देशबांधव लॉरेन्झो मुसेटीचा 6-1, 6-4, 6-2 असा पराभव करत ग्रँड स्लॅममधील हार्ड कोर्टवरील आपला विजयी धडाका 26 सामन्यांपर्यंत वाढवला आहे. बरोबर दोन तासांत सिन्नरने हा विजय मिळवला. शुक्रवारी होणार्या उपांत्य फेरीत सिनरची लढत फेलिक्स ऑगर-अलियासिमशी होईल. ऑगर-अलियासिमने अलेक्स डी मिनौरचा चार तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या झुंजीत पराभव केला. तत्पूर्वी, महिला एकेरीत अमांडा अनिसिमोव्हाने इगा स्वायटेकचा पराभव करून विम्बल्डन फायनलमधील 6-0, 6-0 अशा मानहानीकारक पराभवाचा बदला घेतला आणि उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. सेंटर कोर्टवर 53 दिवसांपूर्वी स्वायटेककडून मिळालेल्या पराभवानंतर, अनिसिमोव्हाने न्यूयॉर्कमधील तिच्या चाहत्यांसमोर हा विजय मिळवला. आता अनिसिमोव्हाचा सामना दोन वेळची विजेती नाओमी ओसाकाशी होईल. ओसाकाने कॅरोलिना मुचोव्हाला हरवून पुनरागमनानंतर प्रथमच ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.