स्पोर्ट्स

FIFA WC 2026 : ॲसिड हल्ल्यातून फिनिक्स भरारी..! योआने विसाच्या ‘गोल्डन हेडर’ गोलने इतिहासच बदलला

रणजित गायकवाड

आयुष्याच्या मैदानात जेव्हा एखादा क्रूर प्रसंग तुमच्यावर अचानक घाला घालतो, तेव्हा दोनच गोष्टी घडू शकतात—एक तर तुम्ही पूर्णपणे कोलमडून जाता, नाहीतर त्या संकटाच्या राखेतून फिनिक्स पक्षासारखी फिनिक्स भरारी घेता. काँगोचा स्टार फुटबॉलपटू योआने विसा (Yoane Wissa) याचा जीवनप्रवास म्हणजेच या अदम्य जिद्दीचे एक जिवंत आणि डोळ्यांत पाणी आणणारे उदाहरण आहे.

१९७४ नंतर आपला पहिलाच विश्वचषक सामना खेळणाऱ्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोला (डीआर काँगो) स्टार फॉरवर्ड योआने विसा याने ऐतिहासिक यश मिळवून दिले. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला जोआओ नेव्हिसने गोल करून बलाढ्य पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली होती; मात्र विसाने स्टॉपेज टाईममध्ये अप्रतिम हेडरद्वारे गोल करत पोर्तुगालची ही आघाडी मोडून काढली आणि सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. विसाचा हा थरारक गोल काँगोसाठी तब्बल ५२ वर्षांनंतरचा पहिला विश्वचषक गोल होता. या कामगिरीमुळे हा सामना काँगोच्या फुटबॉल इतिहासात मैलाचा दगड ठरला.

या ऐतिहासिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर विसाचा भूतकाळातील संघर्ष अत्यंत प्रेरणादायी आहे. अवघ्या चार वर्षांपूर्वी एका भयानक अ‍ॅसिड हल्ल्यात दृष्टी गमावण्याचा धोका ओढवला असतानाही, या अत्यंत प्रतिकूल आणि वेदनादायी परिस्थितीतून सावरत त्याने आज फुटबॉलच्या मैदानात हे उत्तुंग यश संपादन केले.

ती काळ रात्र

ऑगस्ट २०२१ मध्ये फ्रेंच क्लब 'लोरियंट'मधून ८.५ दशलक्ष पाउंडच्या करारावर इंग्लंडच्या 'ब्रेंटफोर्ड' क्लबमध्ये सामील होण्याच्या काही दिवस आधी विसावर हा जीवघेणा हल्ला झाला होता. लोरियंट येथील त्याच्या घरी 'लॅटिटिया पी' नावाच्या महिलेने ऑटोग्राफ घेण्याच्या बहाण्याने प्रवेश करत विसाच्या कुटुंबियांसमोरच त्याच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले आणि त्याच्या मुलीच्या अपहरणाचाही प्रयत्न केला. या गुन्ह्यासाठी न्यायालयाने दोषी लॅटिटिया पी हिला १८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयातील साक्ष

वृत्तानुसार, ब्रिटनीमधील वॅन्स न्यायालयात विसाने त्यावरील ॲसिड हल्ल्याच्या भयानक अनुभवाची साक्ष देताना सांगितले, ‘दरवाजा उघडताच माझ्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले गेले, ज्यामुळे मला श्वास घेणेही कठीण झाले होते. पत्नीच्या प्रसंगावधानामुळे तातडीने शॉवरखाली डोळे धुतल्याने पुढील अनर्थ टळला. रुग्णालयात डॉक्टरांनी डोळे गंभीर भाजल्याचे सांगत दर तासाला ते स्वच्छ केले. ती वेदना एखाद्या छळासारखी होती. हल्ल्यामुळे मी मानसिकदृष्ट्या खचलो असून आता किरकोळ आवाजानेही दचकतो. केवळ मुले सुरक्षित असल्याच्या विचाराने मला जगण्याचे बळ दिले. दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली असून मला आता आयुष्यभर आय ड्रॉप्स वापरावे लागणार आहेत.’

त्या काळात लोरियंटचे व्यवस्थापक ख्रिस्तोफ पेलिसियर यांनी विसाची रुग्णालयात भेट घेतली होती. 'बीबीसी'शी बोलताना त्यांनी सांइतले होते की, ‘योआने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचला असला, तरी त्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्याने यशस्वी होण्याचा निर्धार कधीच सोडला नाही.’

न्युकॅसल युनायटेड आणि अलान शियररचा वारसा

हल्ल्यानंतर अवघ्या एका महिन्याने विसा ब्रेंटफोर्ड संघात सामील झाला आणि त्याने चार हंगामांत १४९ सामन्यांत ४९ गोल केले. त्यानंतर सुमारे ५५ दशलक्ष पाउंडच्या करारासह तो 'न्युकॅसल युनायटेड'मध्ये दाखल झाला. न्युकॅसलमध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला केवळ १३ प्रीमियर लीग सामने खेळता आले. मात्र, फुलहॅमविरुद्धच्या पहिल्या सामन्यात न्युकॅसलचे दिग्गज खेळाडू अलान शियरर यांची ऐतिहासिक 'नंबर ९' क्रमांकाची जर्सी परिधान करून त्याने शानदार गोल केला. यावर अलान शियरर यांनी विसाला सामन्यापूर्वी खास शुभेच्छा संदेश पाठवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT