यशस्वी जैस्वाल 
स्पोर्ट्स

ICC Rankings : आयसीसी कसोटी क्रमवारीत यशस्वी जैस्वालचे मोठे नुकसान

आयसीसीने दीर्घकाळानंतर कसोटी क्रमवारीत बदल जाहीर केला आहे.

रणजित गायकवाड

आयसीसीने कसोटी क्रिकेटमधील नवीन क्रमवारी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. बऱ्याच कालावधीनंतर या क्रमवारीत बदल दिसून येत आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान आयसीसीने ही नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय सलामी फलंदाज यशस्वी जैस्वाल यांना धावा करण्यात अपयश आल्यामुळे, त्याला क्रमवारीत नुकसान झाल्याचे दिसत आहे. तथापि, अव्वल १० फलंदाजांमध्ये फार मोठे फेरबदल झालेले नाहीत.

जो रूट आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल फलंदाज

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी टीम इंडियाने जिंकली. दुसरी कसोटी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर १० ऑक्टोबर पासून खेळली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आयसीसीने कसोटीची नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, ही क्रमवारी २ ऑक्टोबरपर्यंत अद्ययावत (अपडेट) करण्यात आली आहे; त्यामुळे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेतील सर्व आकडेवारी यात समाविष्ट नसावी. असे असूनही, इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याची रेटिंग सध्या ९०८ इतकी आहे.

ब्रूक आणि विल्यमसन अव्वल ३ मध्ये कायम

जो रूटनंतर दुसऱ्या स्थानावरही इंग्लंडच्याच फलंदाजाचा कब्जा आहे. ८६८ रेटिंगसह हॅरी ब्रूक दुसरे स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा केन विल्यमसन (रेटिंग ८५०) आहे. स्टीव्ह स्मिथ ८१६ रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

बावुमा आणि मेंडिसला किंचित फायदा

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार टेम्बा बावुमा यांना यावेळी एका स्थानाचा फायदा झाला आहे. ते आता एक स्थान वर चढून पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांची रेटिंग ७९० आहे. श्रीलंकेचा कामेन्दु मेंडिस यालाही एका स्थानाचा फायदा झाला असून, तो ७८१ रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

जैस्वालला नुकसान

भारताचा सलामी फलंदाज यशस्वी जैस्वालला या क्रमवारीतील बदलामुळे नुकसान झाले आहे. तो दोन स्थानांनी घसरून सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याचे रेटिंग (७७९) कमी झाले आहे. ऋषभ पंत पूर्वीप्रमाणेच ७६१ रेटिंगसह आठव्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल ७४८ रेटिंगसह नवव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा बेन डकेट ७४७ रेटिंगसह दहाव्या स्थानावर कायम आहे.

पहिल्या कसोटीत केवळ ३६ धावांची खेळी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेतील पहिल्या सामन्यात जैस्वालला विशेष कामगिरी करता आली नाही. त्याने ५४ चेंडूंमध्ये केवळ ३६ धावा केल्या, ज्यात सात चौकारांचा समावेश होता. भारताने हा सामना डावाने जिंकल्यामुळे जैस्वालला दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. आता दिल्ली कसोटीत जैस्वाल आणि संपूर्ण टीम इंडिया कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT