IND vs ENG Yashasvi Jaiswal
ओव्हल : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी धडाकेबाज खेळी करणाऱ्या भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालने आपल्या यशाचे रहस्य उलगडले आहे. आपल्या मॅरेथॉन खेळीदरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माने दिलेला एक खास संदेशच आपल्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचे जैस्वालने सांगितले. जैस्वालने या सामन्यात १४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने शानदार खेळी साकारत आपले सहावे कसोटी शतक पूर्ण केले.
त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात आपली आघाडी ३७३ धावांपर्यंत वाढवली आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जैस्वालने रोहित शर्मासोबतच्या त्या खास क्षणाबद्दल माहिती दिली. जैस्वाल म्हणाला, "खेळपट्टी थोडी आव्हानात्मक होती, विशेषतः जिथे चेंडूला थोडी हालचाल आणि सीम मूव्हमेंट मिळत होती. आणि रोहित भाईबद्दल सांगायचं तर, हो, मी त्याला पाहिलं आणि त्याने मला एकच संदेश दिला, 'फक्त खेळत राहा.' बस एवढंच! त्याच्या या संदेशाने मला खूप प्रोत्साहन मिळालं."
याशिवाय, जैस्वालने या अवघड खेळपट्टीवर धावा काढण्यासाठी आपली रणनीती काय होती हे देखील सांगितले. तो म्हणाला की, गोलंदाजांवर दबाव टाकण्याच्या सकारात्मक मानसिकतेनेच तो फलंदाजीला उतरला होता. "हा आमचा शेवटचा डाव असल्याने, मी सतत प्रयत्न करत होतो आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार होतो. मला या सामन्यात अधिकाधिक धावा करायच्या होत्या. पहिल्या डावातील खेळपट्टी पाहिल्यानंतर, मी विचार केला की सर्वोत्तम दृष्टिकोन काय असू शकतो. मी गोलंदाजांवर दबाव टाकण्याच्या उद्देशाने सकारात्मक खेळण्यावर लक्ष केंद्रित केले. ते कुठे गोलंदाजी करतील आणि मला कुठे धावा काढता येतील याचा मी सतत विचार करत होतो," असेही जैस्वालने स्पष्ट केले.
जैस्वालने दिवसाची सुरुवात नाईट वॉचमन म्हणून आलेल्या आकाशदीपसोबत एक मोठी भागीदारी रचून केली. या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरशः हतबल केले. त्यांनी चौथ्या विकेटसाठी १५० चेंडूंत १०७ धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या ख्रिस वोक्सशिवाय खेळणाऱ्या कमकुवत गोलंदाजीची हवाच काढून टाकली. आकाशदीपनेही आपले पहिले कसोटी अर्धशतक झळकावत ९४ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने ६६ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर जैस्वालने करुण नायर (४० धावा) आणि रवींद्र जडेजा (४४ धावा) यांच्यासोबतही महत्त्वपूर्ण भागीदारी करून भारताची आघाडी वाढवण्यात मोलाचा वाटा उचलला.
दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने १ गडी गमावून ५० धावा केल्या होत्या. त्यांना विजयासाठी अजून ३२४ धावांची गरज आहे. दिवसाच्या शेवटच्या क्षणी मोहम्मद सिराजने झॅक क्रॉलीला बाद करून भारताला महत्त्वाचे यश मिळवून दिले.