यशस्वी जैस्वाल (Image source- X)
स्पोर्ट्स

तेंडुलकरच्या 1562 धावांचा ‘तो’ महान विक्रम मोडण्यात जैस्वाल ‘यशस्वी’ होईल?

Yashasvi Jaiswal : 2010 पासून मास्टर-ब्लास्टरचा विक्रम अबाधित

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Yashasvi Jaiswal : टीम इंडियाचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल सध्या चांगलाचा फॉर्ममध्ये आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांत त्याने अर्धशतके झळकावली. त्याने प्रथमच कसोटीच्या दोन्ही डावात 50 हून अधिक धावांची खेळी साकारली. यादरम्यान त्याने माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि सुनिल गावस्कर यांचे विक्रम मोडीत काढले. आता त्याच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम आहे.

खरे तर भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. 2010 मध्ये, त्याने 14 कसोटी सामने खेळले, ज्यात 1562 धावा केल्या. हा एक विक्रम असून तो गेली 14 वर्षे अबाधित आहे. काही फलंदाजांनी मास्टर-ब्लास्टरला मागे टाकण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण त्यांना ते शक्य झाले नाही. आता यशस्वी जैस्वालने मोठी संधी निर्माण केली आहे. 2024 मध्ये भारताला एकूण सात कसोटी सामने खेळायचे आहेत. या सातही सामन्यात यशस्वी टीम इंडियाचा भाग राहून त्याने सातत्यपूर्ण धावा केल्या तर तो नक्कीच सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढेल.

9 कसोटीत 900 हून अधिक धावा

जैस्वालने 2024 मध्ये 9 कसोटी सामने खेळून 929 धावा केल्या आहेत. तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आणखी 634 धावा कराव्या लागतील. सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र या मालिकेत यशस्वी खेळेल हे जवळपास निश्चित झाले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही जैस्वालला संधी मिळणार?

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेदरम्यान पाच कसोटी सामने खेळवले जातील. यातील चार सामने 2024 च्या अखेर पार पडतील. पाचवा आणि शेवटचा सामना जानेवारी महिन्यात खेळला जाणार आहे. अशा प्रकारे जैस्वालचे यंदा सात सामने बाकी आहेत. 9 सामन्यात 900 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूने उर्वरित 7 सामन्यांमध्ये किमान 600 धावा करणे अपेक्षित आहे. मात्र यासाठी दोन ते तीन शतके किंवा द्विशतकी खेळी आवश्यक आहे. यानंतर काही छोटे डाव खेळले तरी काम होईल. सचिनचा हा विक्रम मोडीत निघतो की भविष्यातही अबाधित राहतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT