पुढारी ऑनलाईन डेस्क : World Test Championship WTC : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा थरार पुन्हा एकदा सुरू होणार आहे. बांगलादेशचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे, जिथे 21 ऑगस्टपासून पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून, तिथेही 21 ऑगस्टपासून पहिली कसोटी खेळली जाईल. टीम इंडिया सध्या विश्रांतीवर असून 19 सप्टेंबरपासून ॲक्शनमध्ये दिसणार आहे. दरम्यान, टीम इंडिया पुन्हा एकदा WTC च्या फायनलमध्ये धडक मारण्यात यशस्वी होईल का? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. यासाठी भारतीय संघाला दोन अडथळे पार करावे लागणार आहेत.
डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये सध्या टीम इंडिया पहिल्या स्थानी आहे. येथे रँकिंग पॉइंट्सने नाही तर PCT द्वारे ठरवले जाते. त्यामुळे ते आणखी महत्त्वाचे बनते. सध्या भारताचे पीसीटी 68.51 आहे, जे सर्वोच्च आहे. फायनलपूर्वी टीम इंडियाला अजून 10 कसोटी खेळायच्या आहेत. बांगलादेशविरुद्ध दोन, न्यूझीलंडविरुद्ध तीन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामने बाकी आहेत. बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका मायदेशात आहे.
भारतीय संघाला किमान 6 ते 7 कसोटी सामने जिंकावे लागतील. तरच अंतिम फेरीतील त्यांचा मार्ग सुकर होईल. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटीत टीम इंडिया जिंकेल असा विश्वास आहे. याला कारण म्हणजे बांगलादेशने टीम इंडियाला कधीही कसोटीत पराभूत केलेले नाही. पण खरी कसोटी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध असेल. न्यूझीलंड हा धोकादायक संघ आहे. 2021 मध्ये या संघाने WTC च्या अंतिम फेरीत भारताचा पराभव केला होता. त्यामुळे प्रथमच जागतिक कसोटी विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये या ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला होता. हा संघ भारतीय संघाच्या मार्गात अडथळा बनू शकतो. मात्र, त्यावर मात केल्यास भारत सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. म्हणजे पुढील प्रत्येक सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. एका पराभवाने खेळ खराब होऊ शकतो. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कोणत्या रणनीतीने मैदानात उतरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.