लाहोर : पाकिस्तानने आज येथे झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात गत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेत्या दक्षिण आफ्रिकेचा 93 धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयासह पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेच्या सलग 10 कसोटी विजय मिळवण्याच्या विक्रमी मालिकेला पूर्णविराम दिला. दरम्यान, पाकिस्तानच्या विजयामुळे भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले आहे.
या विजयाचे शिल्पकार ठरले अनुभवी फिरकी गोलंदाज नोमान अली आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी. नोमान अलीने संपूर्ण सामन्यात 10 बळी घेऊन पाकिस्तानच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने पहिल्या डावात 378 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 269 धावांवर बाद झाला. पाकिस्तानला 110 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ 167 धावांवर गारद झाला, त्यामुळे आफ्रिकेसमोर विजयासाठी 277 धावांचे आव्हान होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना, चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ 183 धावांत गुंडाळला गेला. नोमान अली (4/79) आणि शाहीन आफ्रिदी (4/33) यांच्या प्रभावी माऱ्यासमोर आफ्रिकेचे फलंदाज निष्प्रभ ठरले.
दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनल्यानंतर त्यांची ही पहिलीच कसोटी होती, ज्यात त्यांच्या सलग 10 विजयांच्या मालिकेला ब्रेक लागला.
दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्याने पाकिस्तानला WTC मध्ये मोठा फायदा झाला आहे. ते आता ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानावर आले आहेत. यामुळे भारतीय संघाला मात्र या विजयाचा फटका बसला आहे.
पाकिस्तानच्या विजयामुळे सध्याच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताला नुकसान झाले आहे. भारतीय संघाने या चक्रात सर्वाधिक ७ पैकी चार सामने जिंकले असले तरी, विजयाच्या टक्केवारीच्या (PCT) आधारावर संघाला आता तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर यावे लागले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा हा पहिलाच सामना होता आणि विजयामुळे ते १०० टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. तर, ऑस्ट्रेलियाचा संघ त्यांचे सर्व तीनही सामने जिंकून ३६ गुण आणि १०० टक्केवारीसह अव्वल स्थानावर कायम आहे.
श्रीलंका संघ २ पैकी एक सामना जिंकून आणि एक अनिर्णीत राहिल्याने तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत इंग्लंड पाचव्या आणि बांगलादेश सहाव्या स्थानावर आहे. तर, विश्वविजेता दक्षिण आफ्रिका संघ आपला पहिला सामना हरल्यामुळे गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा संघ ५ पैकी सर्व सामने हरून आठव्या स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडच्या संघाला अद्याप या चक्रात आपला प्रवास सुरू करायचा आहे.
दक्षिण आफ्रिकेने सलग १० कसोटी सामने जिंकल्यानंतर आता या विश्वविजेत्या संघाला रेड बॉल फॉरमॅटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेला यापूर्वी २०२३-२४ मध्ये भारताकडून शेवटचा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर संघाने १२ सामने जिंकले होते, तर जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना धरून सलग १० कसोटी सामने जिंकले होते. आता पाकिस्तानने त्यांचा विजय रथ रोखला आहे. मालिकेतील दुसरा सामना आता २० ऑक्टोबरपासून रावळपिंडी येथे होईल, जिथे पाहुणा संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.