पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० अशी जिंकत ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC)मध्ये मुसंडी मारलेल्या न्यूझीलंड संघाला मोठा झटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) न्यूझीलंड आणि इंग्लंड दोन्ही संघाचे गुणात कपात केली आहे. दोन्ही संघांना मॅच फीच्या १५ टक्के दंड आणि तीन WTC गुण कापण्यात आले आहेत. ( WTC Points Table Update)
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेत क्राइस्टचर्चमध्ये पहिला कसोटी सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंडला संथ ओव्हर-रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे, असे आयसीसीने म्हटले आहे. दोन्ही संघानी निर्धारित वेळेत तीन षटके कमी टाकली आणि प्रत्येक षटक कमी टाकल्याबद्दल त्यांना एक गुण दंड ठोठावण्यात आला.दोन्ही संघांना त्यांच्या मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे आणि तीन महत्त्वपूर्ण जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील गुण वजा करण्यात आले आहेत.
WTC गुणतालिकेत तीन गुणांची कपात हा न्यूझीलंडसाठी मोठा धक्का आहे. कारण यामुळे संघ गुणतालिकेत थेट पाचव्या स्थानावर घसरला आहे. तसेच मालिकेतील पहिला सामना जिंकूनही इंग्लंडचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर न्यूझीलंडचे तीन गुण कमी झाल्याने चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. न्यूझीलंडचे आता ४७.९२ टक्के गुण आहेत आणि इंग्लंडविरुद्धचे उर्वरित दोन सामने जिंकूनही ते आपले गुण कमाल ५५.३६ टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात.
न्यूझीलंडने गुण वजा करणे ही भारतासाठी गूड न्यूज ठरली आहे. टीम इंडिया WTC गुणतालिकेत सध्या ६१.११ टक्के गुणांसह अव्वल आहे. दक्षिण आफ्रिका ( ५९.२६ टक्के गुण), ऑस्ट्रेलिया (५७.२६ टक्के गुण) आणि श्रीलंका (५० टक्के गुण) अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.