स्पोर्ट्स

Team India WTC Final : भारताचा ‘डब्‍ल्‍यूटीसी’ फायनलचा मार्ग कठीण, ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका संघ आघाडीवर

रणजित गायकवाड

मुंबई : कोलंबो कसोटीच्या अंतिम दिवशी श्रीलंका संघाला सर्वबाद करण्यात अपयश आल्यामुळे भारतीय संघाला तब्बल ८ गुण गमवावे लागले आहेत. या अनिर्णीत सामन्यामुळे भारताची गुणसंख्या ५१.५२ टक्क्यांवर घसरली असून, ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५-२०२७’ (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणे आता टीम इंडियासाठी मोठे आव्हान बनले आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने मॅके येथे बांगला देशचा पराभव करून ८० टक्के गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे.

गुणतालिकेत ६० टक्के गुणांचा टप्पा ओलांडण्यासाठी आणि अव्वल २ मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रमुख संघांची समीकरणे (गणिते) खालीलप्रमाणे आहेत.

प्रमुख संघांचे समीकरण (शिल्लक ३३ सामने) : ऑस्ट्रेलिया (८०.०० टक्के): शिल्लक १२ पैकी ५ विजय आणि १ ड्रॉ मिळवल्यास ऑस्ट्रेलिया ६० टक्के गुणांचा टप्पा पार करेल. ७ सामने जिंकल्यास त्यांची टक्केवारी ६८.१८ टक्के होईल.

दक्षिण आफ्रिका (७५.०० टक्के) : उरलेले १० पैकी ८ सामने घरच्या मैदानावर आहेत. अंतिम फेरीत प्रवेशासाठी त्यांना किमान ५ विजय आणि २ ड्रॉ हवे आहेत. ६ विजयांसह ६४.२८ टक्के गुण मिळतील.

न्यूझीलंड (७२.२२ टक्के): उरलेल्या १० सामन्यांत ५ विजय व १ ड्रॉ आवश्यक आहे. ६ सामने जिंकल्यास ६४.५८ टक्के गुणांसह ते शर्यतीत कायम राहतील.

बांगला देश (५५.५६ टक्के): शिल्लक ६ पैकी ४ सामने जिंकल्यास ६० टक्के चा टप्पा गाठता येईल. ५ विजय मिळवल्यास गुणसंख्या ६९.४४ टक्के होईल.

भारताची स्थिती (५१.५२ टक्के) : भारताकडे न्यूझीलंडविरुद्ध ३ (परदेशी) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ (घरच्या मैदानावर) असे एकूण ७ सामने शिल्लक आहेत. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला ७ पैकी किमान ५ सामने जिंकणे आणि १ सामना ड्रॉ करणे अनिवार्य आहे. ५ विजय आणि २ पराभवांमुळे भारताची गुणसंख्या ५९.३ टक्के होईल, जी अंतिम फेरीसाठी अपुरी ठरू शकते. ६ विजयांसह ६४.८ टक्के, तर सर्व ७ सामने जिंकल्यास ७०.३७ टक्के गुण मिळतील. त्यामुळे भारतासाठी आता चुकांना वाव राहिलेला नाही.

श्रीलंका, इंग्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT