लंडन : लॉर्डस्च्या ऐतिहासिक मैदानावर बवूमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकन संघ आपल्या पहिल्यावहिल्या आयसीसी जेतेपदाच्या समीप पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये विजयासाठी 282 धावांचे आव्हान असताना द. आफ्रिकेने तिसर्या दिवसअखेर 56 षटकात 2 बाद 213 धावांपर्यंत आश्वासक मजल मारली.
या लढतीत द. आफ्रिकेला पहिल्यावहिल्या जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी द. आफ्रिकेला केवळ 69 धावांची गरज आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला आफ्रिकेचा विजयाचा घास हिसकावून घेण्यासाठी द. आफ्रिकेचे उर्वरित 8 फलंदाज शक्य तितक्या लवकर बाद करावे लागतील.
विजयासाठी 282 धावांचे खडतर आव्हान असताना दक्षिण आफ्रिकेची 17.4 षटकांत 2 बाद 90 अशी स्थिती होती. याचवेळी मार्कराम व बवूमा यांनी तिसर्या गड्यासाठी 143 धावांची अभेद्य भागीदारी साकारली. शतकवीर एडन मार्कराम 102, तर कर्णधार बवूमा 65 धावांवर खेळत होते. मार्करामने 159 चेंडूत 11 चौकार फटकावले, तर बवुमाच्या 65 चेंडूतील खेळीत 5 चौकारांचा समावेश होता. या जोडीसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले.
50 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या डावात स्टार्क व हॅझलवूड यांनी 10 व्या गड्यासाठी केलेली 59 धावांची भागीदारी ऐतिहासिक ठरली. या जोडीने आयसीसीच्या कोणत्याही फायनलमध्ये शेवटच्या गड्यासाठी 1975 वन-डे वर्ल्डकप फायनलमध्ये डेनिस लिली-जेफ थॉमसन यांचा 41 धावांचा विक्रम मोडीत काढला.