Smriti Mandhana WPL Auction 2026:
नवी दिल्लीमध्ये २७ नोव्हेंबर रोजी WPL 2026 चा मेगा लिलाव संपन्न झाला. या लिलावात फ्रेंचायजींनी महिला खेळाडूंवर सढळ हातानं बोली लावली. या लिलावात २७७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यातील १९४ खेळाडू हे भारतीय तर ८३ खेळाडू हे परदेशी होते. प्रत्येक फ्रेंचायजीनं १८ खेळाडूंचा संघ निवडला. त्यात जास्तीजास्त ६ परदेशी खेळाडू ठेवण्याची मुभा होती.
जरी या लिलावात अनेक खेळाडूंना कोट्यावधीची बोली लागली असली तरी लिलावात सहभागी होऊ न शकलेल्या स्मृती मानधनाचा WPL आतापर्यंतच्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडूचा टॅग मात्र अबाधित राहिला आहे. आरसीबीची कर्णधार स्मृती तिच्या कौटुंबिक कारणांमुळं या लिलावात सहभागी होऊ शकली नाही.
रॉयल चॅलेंजर बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधना ही WPL च्या इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. २०२३ च्या पहिल्या हंगामात आरसीबीनं स्मृती मानधनाला ३.४० कोटी रूपयांमध्ये खरेदी केली होतं. भारताची उपकर्णधार असलेली स्मृती तिच्या धडाकेबाज डावखुऱ्या फलंदाजीसाठी ओळखली जाते. इतकंच नाही तर आरसीबीला व्यावसायिक क्रिकेटमधील सर्वात पहिली ट्रॉफी जिंकून देण्याचा मान देखील स्मृतीलाच मिळतो. आरसीबीने २०२४ चे WPL विजेतेपद पटकावले होते.
भारताची अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्माला यंदाच्या WPL लिलावात छप्पर फाड के बोली लागली आहे. युपी वॉरियर्सनं तिला ३.२० कोटी रूपयात खरेदी केलं. दिप्ती ही भारताची अव्वल फिरकीपटू असून ती मधल्या फळीत उत्तम फलंदाजी देखील करू शकते. तिने आपल्या फलंदाजीच्या आणि गोलंदाजीच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. दबावात चांगला खेळ करणे ही तिची जमेची बाजू आहे.
ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू अश्लेघ गार्डनरला WPL 2023 च्या लिलावात ३.२ कोटी रूपयांची बोली लागली होती. ती एक उत्तम ऑफ स्पिनर असून आक्रमक फलंदाजी करण्याची तिची क्षमता आहे. त्यामुळे ती एक उत्तम अष्टपैलू पॅकेज आहे.
इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू नताली सिव्हर ब्रंटला देखील २०२३ च्या लिलावात ३.२ कोटी रूपयांची बोली लागली होती. ती WPL लिलावातील चौथ्या क्रमांकाची सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. ती मधल्या फळीतील एक आश्वासक फलंदाज आणि मध्यम गती गोलंदाज आहे. तीच्या अष्टपैलू खेळामुळं ती संघातील एक महत्वाचा खेळाडू ठरते.
न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केरला मुंबई इंडियन्सनं २०२६ च्या wpl लिलावात ३ कोटी रूपयांना खरेदी केलं. केर ही डावखुरी फलंदाज असून ती भरवशाची ऑफ स्पिनर देखील आहे. दोन वेळा wpl टायटल जिंकलेल्या मुंबई इंडियन्सनं तिचं हेच अष्टपैलूत्व अन् संघाला लवचिकता देणारे गुण पाहून तिच्यावर ३ कोटींची बोली लावली.