WTC मध्ये जेमिमाच्या नावावर २७ सामन्यांत ५०७ धावा
दिल्ली कॅपिटल्स संघाला सलग तीन वेळा संघाला फायनलपर्यंत नेणाऱ्या मेग लॅनिंगची जागा जेमिमा रॉड्रिग्ज घेणार
दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदल यांनी भारतीय महिलेकडेच संघनेतृत्त्वाचे दिले होते संकेत
WPL 2026 Delhi Capitals captan Jemimah Rodrigues
नवी दिल्ली: महिला प्रीमियर लीगच्या (WPL) आगामी चौथ्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सलग तीन वेळा संघाला फायनलपर्यंत नेणाऱ्या मेग लॅनिंगची जागा आता भारताची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज घेणार आहे. २५ वर्षीय जेमिमावर दिल्ली कॅपिटल्सने विश्वास दाखवत तिला आपला नवा कर्णधार म्हणून घोषित केले आहे.
आतापर्यंत पार पडलेल्या तिन्ही हंगामात ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगने दिल्ली संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, मेगा लिलावात लॅनिंगला यूपी वॉरियर्सने खरेदी केल्यामुळे दिल्लीला नव्या कर्णधाराचा शोध होता. संघात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लौरा वोल्वार्ड्ट सारखा अनुभवी पर्याय असतानाही, दिल्लीच्या मालकांनी भारतीय खेळाडूला प्राधान्य देत जेमिमाची निवड केली आहे.
जेमिमा सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. नुकतीच महिला विश्वचषक स्पर्धेतील तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत शानदार शतक ठोकून भारताला विजय मिळवून दिला होता. तिने सध्या सुरू असलेल्या श्रीलंका विरुद्धच्या टी-२० मालिकेत पहिल्याच सामन्यात नाबाद ६९ धावांची खेळी केली आहे. वुमन प्रीमयर लीगमध्ये जेमिमाने आतापर्यंत २७ सामन्यांत १३९.६६ च्या स्ट्राईक रेटने ५०७ धावा आपल्या नावावर केल्या आहेत.
लिलावादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदल यांनी स्पष्ट केले होते की, "आम्हाला यावेळेस भारतीय कर्णधार हवा आहे आणि आम्ही तसा निर्णय घेतला आहे." जेमिमा २०२३ पासून या संघाचा अविभाज्य भाग आहे. तिला शेफाली वर्मा, अॅनाबेल सदरलँड आणि मारिझान कॅप यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत संघाने रिटेन केले आहे.जेमिमाने यापूर्वी टीम इंडिया किंवा WPL मध्ये कधीही नेतृत्व केलेले नाही. त्यामुळे कर्णधार म्हणून तिला मोठी संधी असणार आहे.
WPL २०२६ चा थरार ९ जानेवारी पासून सुरू होत आहे. गेल्या तीन हंगामात उपविजेतेपदावर समाधान मानाव्या लागणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला जेमिमा आपल्या कप्तानीखाली पहिले जेतेपद मिळवून देणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.