दोहा कतार : जागतिक बुद्धिबळ क्षेत्रातील महान खेळाडू मॅग्नस कार्लसनने आपल्या अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हे त्याचे या प्रकारातील विक्रमी नववे जेतेपद ठरले. अंतिम फेरीत त्याने उझबेकिस्तानच्या तरुण ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हचा 2.5-1.5 अशा फरकाने पराभव केला.
गेल्या आठवड्यात ‘रॅपिड’ प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या या दिग्गज ग्रँडमास्टरने आता ‘ब्लिट्झ’मध्येही सुवर्ण कमाई करत आपले दुहेरी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अंतिम लढतीच्या चौथ्या डावात 1.5-1.5 अशी बरोबरी असताना, कार्लसनने प्याद्याची विलक्षण खेळी करून अब्दुसत्तोरोव्हला चकित केले आणि विजय निश्चित केला.
भारताच्या 22 वर्षीय अर्जुन एरिगेसीने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. 19 फेऱ्यांच्या स्विस पात्रता फेरीत त्याने 15 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. मात्र, उपांत्य फेरीत दडपण हाताळताना त्याचा अंदाज चुकला आणि यानंतर त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक ब्लिट्झ स्पर्धेत पदक जिंकणारा तो दिग्गज विश्वनाथन आनंदनंतरचा केवळ दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे.
पात्रता फेरीअखेर अर्जुन एरिगेसी 15 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होता. अमेरिकेचा फॅबियानो कारुआना (14 गुण) दुसऱ्या, तर कार्लसन (13.5) आणि अब्दुसत्तोरोव्ह (13) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर होते. पहिल्या उपांत्य फेरीत कार्लसनने कारुआनाचा 3-1 असा धुव्वा उडवला. दुसऱ्या उपांत्य फेरीत अब्दुसत्तोरोव्हने एरिगेसीचा 2.5-0.5 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. एरिगेसीने पात्रता फेरीत कार्लसन आणि अब्दुसत्तोरोव्ह या दोघांनाही नमवले होते. मात्र, उपांत्य फेरीत तो हाच फॉर्म कायम राखू शकला नाही.
महिलांच्या ब्लिट्झ स्पर्धेत कझाकिस्तानच्या बिबिसारा असाउबायेवाने युक्रेनच्या अण्णा मुझिचुकचा 2.5-1.5 असा पराभव करत तिसऱ्यांदा जागतिक विजेतेपद मिळवले. या विजयासह तिने 2026 च्या प्रतिष्ठेच्या ‘कँडिडेटस्’ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. 2021 आणि 2022 नंतरचे तिचे हे तिसरे जागतिक ब्लिट्झ जेतेपद आहे.
ही स्पर्धा माझ्यासाठी अत्यंत कठीण होती. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमधील पराभवानंतर विजयाच्या ट्रॅकवर परतणे आव्हानात्मक होते. मात्र, सुदैवाने मला यात यश मिळाले. नॉकआऊट फेरीत दडपण झुगारून खेळण्याची रणनीती यशस्वी ठरली.-नॉर्वेचा जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन
या स्पर्धेत पात्रता फेरीदरम्यान कार्लसन एका वादामुळे चर्चेत आला होता. 14 व्या फेरीत अर्मेनियाच्या हायक मार्टिरोस्यानविरुद्ध खेळताना, वेळेच्या कमतरतेमुळे कार्लसनच्या हातून बोर्डावरील मोहरे विखुरले गेले. मोहरे पुन्हा जागेवर लावताना त्याने चुकीच्या पद्धतीने घड्याळ दाबून वेळ वाढवून घेण्याचा प्रयत्न केला. ‘फिडे’च्या नियमांनुसार हा प्रकार खेळाच्या शिस्तीला बाधा आणणारा ठरवण्यात आला आणि पंचांनी मार्टिरोस्यानला विजयी घोषित केले. कार्लसनने हा निर्णय स्वीकारत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. मात्र, नंतर कार्लसनने याची पुरेपूर भरपाई केल्याचे निकालावरून सुस्पष्ट झाले.