स्पोर्ट्स

World Athletics Championships 2025 : टोकियोत नीरज चोप्राचे सुवर्णपदक राखण्याचे लक्ष्य

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा आजपासून : भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे सार्‍यांचे लक्ष

रणजित गायकवाड

टोकियो : जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक राखणारा आणि जगातील तिसरा भालाफेकपटू बनण्याच्या निर्धाराने शनिवारी टोकियोमध्ये सुरू होणार्‍या स्पर्धेत भारताची एकमेव पदकाची आशा म्हणून नीरज चोप्रा मैदानात उतरणार आहे.

2023 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या मागील हंगामात नीरजने 88.17 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते, तर पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीम (87.82 मी) आणि झेक प्रजासत्ताकचा याकूब वादलेच (86.67 मी) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले होते.

18 सप्टेंबर रोजी होणार्‍या या स्पर्धेत जर नीरजने अंतिम फेरीत पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकले, तर तो सलग दोन जागतिक विजेतेपद जिंकणारा तिसरा भालाफेकपटू ठरेल. यापूर्वी हा पराक्रम झेक प्रजासत्ताकचा दिग्गज खेळाडू जॅन झेलेझनी (1993 आणि 1995) आणि ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स (2019 आणि 2022) यांनी केला आहे. विशेष म्हणजे, झेलेझनी आता नीरजच्या प्रशिक्षक चमूचा भाग आहेत.

या स्पर्धेत नीरज चोप्रा 19 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत त्याचा सामना अर्शद नदीमसोबत होणार आहे, जो पॅरिस ऑलिम्पिकनंतर प्रथमच त्यांच्याविरुद्ध खेळणार आहे. टोकियोतील स्पर्धेत नीरजसाठी सोपे नसेल. त्याच्यासमोर नदीम आणि जर्मनीचा नवीन डायमंड लीग चॅम्पियन ज्युलियन वेबरसारख्या मजबूत प्रतिस्पर्धकांचे आव्हान असेल.

याशिवाय पीटर्स, केनियाचा 2015 चा विश्वविजेता ज्युलियस येगो, 2012 चा ऑलिम्पिक चॅम्पियन केशॉर्न वॉलकॉट आणि अनुभवी वादलेच हेही स्पर्धेत असतील. गेल्या महिन्यात 91 मीटरची फेक करणारा ब्राझीलचा लुईझ दा सिल्वादेखील एक मजबूत दावेदार आहे.

या हंगामातील कामगिरी पाहता वेबर हा सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मानला जातो. त्याने यावर्षी तीन वेळा 90 मीटरचा टप्पा पार केला आहे आणि 91.51 मीटरच्या फेकसह तो जागतिक क्रमवारीत आघाडीवर आहे. यावर्षी नीरजने दोहा डायमंड लीगमध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडला; पण त्याच्या काही फेकी साधारण होत्या. या हंगामात वेबरविरुद्धच्या चार स्पर्धांमध्ये नीरजने केवळ एक विजय मिळवला आहे.

भालाफेकीत चार भारतीय

यंदाच्या स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकीत भारत सर्वाधिक चार खेळाडूंसह सहभागी होत आहे. नीरज चोप्राला गतविजेता म्हणून वाईल्ड कार्ड मिळाले आहे, तर सचिन यादव, यशवीर सिंग आणि रोहित यादव यांचा समावेश जागतिक क्रमवारीतून करण्यात आला आहे. मागील वर्षी तीन भारतीय खेळाडू अंतिम फेरीमध्ये पोहोचले होते, ज्यात नीरजने सुवर्ण, किशोर जेनाने पाचवे आणि डी. पी. मनूने सहावे स्थान मिळवले होते.

इतर खेळाडूंकडूनही अपेक्षा

नीरज व्यतिरिक्त, महिला भालाफेकपटू अन्नु राणी, महिला 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये पारुल चौधरी, पुरुष लांब उडीत मुरली श्रीशंकर, पुरुष 5000 मीटरमध्ये गुलवीर सिंग आणि पुरुष तिहेरी उडीमध्ये प्रवीण चित्रवेल यांच्याकडूनही अंतिम फेरीत पोहोचण्याची अपेक्षा आहे. शनिवारी सकाळी पुरुष आणि महिलांच्या 35 कि.मी. रेस वॉक स्पर्धांनी भारतीय खेळाडूंच्या मोहिमेला सुरुवात होईल. यात राम बाबू, संदीप कुमार आणि प्रियांका गोस्वामी सहभागी होतील. संध्याकाळच्या सत्रात पूजा 1500 मीटरच्या हीटमध्ये धावेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT