भारतीय महिला संघाने नुकताच आयसीसी महिला वनडे विश्वचषक जिंकून इतिहास रचला. टीम इंडियासाठी ही पहिलीच आयसीसी ट्रॉफी ठरली आहे. या विश्वविजेत्या संघातील यष्टिरक्षक ऋचा घोष आता मानद पोलिस उप-अधीक्षक बनली आहे. पश्चिम बंगाल सरकारने ऋचाची या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती केली आहे. यासोबतच, राज्य सरकारने तिला ‘बंग भूषण’ या प्रतिष्ठित पुरस्कारानेही सन्मानित केले.
कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर बंगाल क्रिकेट असोसिएशनने ऋचा घोषसाठी एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः हजेरी लावली.
शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्यात २२ वर्षीय ऋचाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते ऋचाला गोल्डन बॅट, बंग भूषण पुरस्कार, एक सोन्याची साखळी (चेन) आणि डीएसपी नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. तसेच तिला ३४ लाख रुपयांचा चेकही देण्यात आला. द. आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऋचाने केवळ २४ चेंडूंमध्ये ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती, ज्यात तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. भारताने ७ बाद २९८ असा मोठा स्कोअर उभारला होता. त्यानंतर द. अफ्रिकेचा २४६ धावांवर ऑलआऊट करून हा अंतिम सामना टीम इंडियाने ५२ धावांनी जिंकला.
यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘ऋचा आपल्या तडफदार खेळाने अनेक विकरम रचेल. मानसिक सामर्थ्य ही सर्वात मोठी शक्ती आहे. तुम्ही कठोर परिश्रम करत राहायला हवे, अडचणींवर मात करायला हवी आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायला हवे. तुला संघर्ष करत रहायचे आहे. त्यातून उत्कृष्ट कामगिरी नक्कीच साध्य होईल,’ अशी भावना ममतादीदींनी व्यक्त केली.
याचदरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात म्हटलंय की, ‘डीएसपी ऋचा घोष, हार्दिक अभिनंदन! बंगालची शान असलेली ऋचा आता पोलिस उप-अधीक्षक बनली आहे. विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची ती महत्त्वाची भाग होती. तिची पश्चिम बंगाल सरकारने पोलिस दलात डीएसपी पदावर नियुक्ती केली आहे.’
विश्वचषकातील भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शिल्पकारांपैकी एक असलेल्या ऋचाने या स्पर्धेत आठ डावांमध्ये १३३.५२ च्या प्रभावी स्ट्राइक रेटने २३५ धावा फटकावल्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये तिचा पाचवा क्रमांक लागतो.
भारताचे माजी कर्णधार आणि सध्याचे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही ऋचाचे कौतुक केले. ती एक दिवस भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवेल, अशी त्यांनी आशा व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ऋचाने झुलन गोस्वामी हिच्या सारख्या उंचीवर पोहोचावे अशी आमची इच्छा आहे. एक दिवस आपण येथे उभे राहून ‘ऋचा भारताची कर्णधार आहे’ असे अभिमानाने सांगू, अशी आम्हाला अपेक्षा आहे.’ या कार्यक्रमाला माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीही उपस्थिती होती.