Women's T20 World Cup
मुंबई: महिला टी-२० विश्वचषकासाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुख्यालयात निवड समितीच्या बैठकीनंतर या संघाची अधिकृत घोषणा झाली. या जागतिक स्पर्धेत भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. भारताने गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते, आता संघाचे लक्ष पहिल्या टी-२० विश्वचषक विजेतेपदावर असेल. महिला टी-२० विश्वचषक १२ जून ते ५ जुलै या कालावधीत इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवला जाणार आहे.
महिला टी-२० विश्वचषक २०२६: भारतीय संघ :हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्री चरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर,क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव
टी-२० विश्वचषकासाठी १२ संघांची दोन गटांत (प्रत्येकी सहा संघ) विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघाचा समावेश गट-१ मध्ये करण्यात आला आहे. गट-१ ला 'ग्रुप ऑफ डेथ' मानले जात आहे, कारण यात दिग्गज संघांसोबतच भारत-पाकिस्तानमधील पारंपरिक कट्टर लढतही पाहायला मिळणार आहे.
गट १: ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड्स.
गट २: वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट फेरीतील सामना १४ जून रोजी एजबॅस्टन येथे खेळवला जाईल. या हाय-व्होल्टेज सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्धचे भारताचे सामनेही रोमांचक ठरणार आहेत.