स्पोर्ट्स

Women’s T20 WC : भारतीय महिलांचा ६ विकेट राखून विजय

Shambhuraj Pachindre

केपटाऊन; वृत्तसंस्था : महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने बुधवारी लागोपाठ दुसर्‍या शानदार विजयाची नोंद करताना विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला 6 गडी राखून आरामात पराभूत केले. विजयासाठी आवश्यक असलेल्या 119 धावा टीम इंडियाने 11 चेंडू शिल्लक असताना फटकावल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यष्टिरक्षक रिचा घोष भारतीय विजयाच्या शिल्पकार ठरल्या. (Women's T20 WC)

भारताकडून सलामीवीर शेफाली वर्माने 28 धावांची चमकदार खेळी केली. 23 चेंडूंचा सामना करून तिने पाच चौकार ठोकले. बहुचर्चित सलामीवर स्मृती मानधना मात्र फार काळ तग धरू शकली नाही. उंच फटका मारण्याच्या नादात ती क्रीझ सोडून खूपच पुढे आली आणि बाकीचे काम यष्टिरक्षक रशादा विल्यम्सने पार पाडले. यावेळी गोलंदाज होती ती करिष्मा रंभारक. स्मृतीने 10 धावा केल्या. शेफालीदेखील करिष्माचा बळी ठरली. (Women's T20 WC)

स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेली जेमिमाह रॉड्रिग्ज ही कर्णधार हॅले मॅथ्यूजला फटकावण्याच्या नादात बाद झाली. हॅलेनेच तिचा फटका हवेत झेपावत अलगद झेलला. जेमिमाह 1 धावा करून तंबूत परतली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तिने तुफानी फटकेबाजी करून नाबाद अर्धशतक ठोकले होते. जेमिमाह बाद झाल्यानंतर हरमनप्रीत आणि रिचा यांनी सूत्रे हाती घेऊन आकर्षक फलंदाजीचे दर्शन रसिकांना घडविले. हरमनपेक्षाही रिचाने संधी मिळेल तेव्हा प्रतिपक्षाची गोलंदाजी फोडून काढण्याचा सपाटाच लावला होता.

भारतीय संघ सामना जिंकण्याच्या बेतात असताना हरमनप्रीत उंच फटका मारण्याच्या नादात बाद झाली. तिने 42 चेंडूंचा सामना करून मौल्यवान 32 धावा जोडल्या. यात 3 चौकारांचा समावेश होता. दुसरीकडे, रिचाने नाबाद राहून 44 धावा झोडल्या त्या केवळ 32 चेंडूंत. तिने पाच चौकार हाणले. विंडीजचे गोलंदाज तिला बाद करू शकले नाहीत. विजयी चौकार रिचानेच लगावला.

विंडीजकडून एकूण सात गोलंदाजांनी मारा केला. त्यात करिष्मा सर्वात यशस्वी ठरली. तिने दोन बळी मिळवले. तसेच कर्णधार हॅले मॅथ्यूज आणि चिनेली हेन्री यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला. या विजयाबरोबरच भारताच्या पुढील फेरीतील प्रवेशाच्या आशा दुणावल्या आहेत. त्यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 118 धावा केल्या. त्यांच्या स्टॅफनी टेलरने सर्वाधिक म्हणजे 42 धावांची उपयुक्त खेळी केली. 40 चेंडूंचा सामना करून तिने सहा चौकार ठोकले.

शेमाईन कॅम्पबेलने 36 चेंडूंत तीन चौकारांसह 30 धावा फटकावल्या. चेडीन नेशनने 18 चेंडूंत 21 आणि शबिका गजनबीने 13 चेंडूंत 15 धावा केल्या त्या दोन चौकारांनिशी. कर्णधार हॅले मॅथ्यूज केवळ दोन धावांवर तंबूत परतली. पूजा वस्त्राकरने यष्टिरक्षक रिचा घोषकरवी तिला झेलबाद केले. भारताकडून सर्वच गोलंदाजांनी किफायतशीर मारा केला. त्यात दीप्ती शर्मा सर्वात यशस्वी ठरली. तिने 4 षटकांत केवळ 15 धावा देऊन तीन बळी मिळविले. रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी एका गड्याला तंबूत पाठवले. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने विंडीजला रोखण्यासाठी तब्बल सात गोलंदाजांचा वापर केला. राजेश्वरी गायकवाड सर्वात महागडी गोलंदाज ठरली. तिने चार षटकांत 30 धावा दिल्या.

लागोपाठ दुसरा विजय

या स्पर्धेत भारतीय संघाने मिळवलेला हा लागोपाठ दुसरा विजय ठरला. आधीच्या लढतीत हरमनप्रीत कौरच्या चमूने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला सात गड्यांनी धूळ चारली होती. बुधवारच्या लढतीतही भारताने विंडीजवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. आता 'ब' गटात दोन विजयांसह भारतीय संघ दुसर्‍या स्थानावर असून इंग्लंडचा संघ अव्वल क्रमांकावर आहे. येत्या 18 रोजी भारताचा सामना तगड्या इंग्लंडशी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT