पुणे ; वृत्तसंस्था : शफाली वर्मा आणि लॉरा वोल्वार्डच्या (Women's T20 Challenge) वादळी अर्धशतकांच्या जोरावर व्हेलोसिटीने सुपरनोव्हासला 7 गडी राखून पराभूत केले आहे.
महिलांच्या टी-20 चॅलेंजर्स चषक स्पर्धेअंतर्गत मंगळवारी पुणे येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून व्हेलोसिटी संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या सुपरनोव्हास संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 150 धावा केल्या.
सुपरनोव्हासकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. मुख्य म्हणजे हरमनप्रीतने सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान पटकावला. मात्र, तिची ही तडाखेबंद खेळी निष्फळ ठरली. कारण, केवळ 3 गडी गमावून व्हेलोसिटी संघाने 151 धावा फटकावल्या त्या 18.2 षटकांत. (Women's T20 Challenge)
शफालीने 51 धावांची जोरदार खेळी केली. तिने 33 चेंडूंचा सामना करताना नऊ चौकार आणि एक षटकार खेचला. तसेच लॉराने 51 धावांच्या खेळीत सात चौकार व एक षटकार लगावला. तिने 35 चेंडूंचा सामना केला. विजयी संघाची कर्णधार दीप्ती शर्माने नाबाद 24 धावांचे योगदान दिले. तब्बल 10 चेंडू राखून हा सामना व्हेलोसिटी संघाने आरामात जिंकला.