महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2026) सलामीच्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना एका ऐतिहासिक थराराचा अनुभव आला. एका क्षणी मुंबई इंडियन्सच्या खिशात असलेला सामना नादिन डी क्लार्कने आपल्या अचाट फलंदाजीच्या जोरावर हिसकावून आणला. शेवटच्या षटकात आरसीबीला विजयासाठी मोठ्या धावांची गरज असताना, डी क्लार्कने अशक्य वाटणारा विजय शक्य करून दाखवला.
शेवटच्या षटकाचा थरार : ६, ४, ६, ४..!
मुंबईची अनुभवी गोलंदाज नॅट सायव्हर-ब्रंट शेवटचे षटक टाकत होती. पहिल्या दोन चेंडूंत एकही धाव न आल्याने आरसीबीच्या आशा मावळल्या होत्या, पण त्यानंतर जे घडले ते अविश्वसनीय होते
१९.३ वे षटक : डी क्लार्कने जागेवरून चेंडू लॉन्ग-ऑफच्या डोक्यावरून भिरकावून दिला – षटकार!
१९.४ वे षटक: पाय खेचून घेत शानदार चौकार मारला आणि आपले अर्धशतक पूर्ण केले.
१९.५ वे षटक : सायव्हर-ब्रंटचा स्लोअर बॉल डी क्लार्कने ओळखून काऊ कॉर्नरला टोलावला – पुन्हा एक प्रेक्षणीय षटकार!
१९.६ वे षटक : शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना डी क्लार्कने चौकार मारून आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले!
डी क्लार्क ठरली 'रिअल हिरो'
मैदानात दव असल्याने चेंडू ओला झाला होता. कर्णधार हरमनप्रीत कौर चेंडू पुसून रणनीती आखत होती, पण डी क्लार्कच्या आत्मविश्वासापुढे मुंबईची सर्व गणिते फेल ठरली. डी क्लार्कने याआधी विश्वचषकात भारता विरुद्ध अशीच खेळी केली होती, त्याचीच पुनरावृत्ती आज आरसीबीसाठी केली.
विजयी चौकार मारताच आरसीबीच्या खेळाडूंनी मैदानात धाव घेत नादिन डी क्लार्कला मिठी मारली. ४०/० वरून ६३/५ अशी अवस्था झालेल्या आरसीबीने हा सामना जिंकून 'कमबॅक' कसे करावे, याचा नवा वस्तुपाठ घालून दिला आहे.
WPL च्या इतिहासात पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर विजय मिळवण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे:
२०२४ : मुंबई विरुद्ध दिल्ली (बेंगळुरू)
२०२५ : दिल्ली विरुद्ध मुंबई (बडोदा)
२०२६ : आरसीबी विरुद्ध मुंबई (नवी मुंबई)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची पडझड थांबण्याचे नाव घेत नाहीये. निकोला कॅरीने एकाच षटकात दुसरा बळी मिळवत आरसीबीच्या उरल्यासुरल्या आशांना सुरुंग लावला आहे. १६.६ व्या षटकात श्रेयंका पाटील केवळ १ धाव करून बाद झाली.
निकोला कॅरीने टाकलेल्या 'फुल लेन्थ' चेंडूवर श्रेयंकाने जागा बनवून फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूची गती तिला चकवून गेली. चेंडू थेट 'ऑफ-स्टंप'ला चाटून यष्टिरक्षक कमालिनीच्या हातात गेला. यष्ट्या पडल्यानंतर गोंधळ निर्माण झाला होता की, चेंडू बॅटला लागला की कमालिनीच्या ग्लोव्हजला? मात्र, टीव्ही अंपायरने रिप्लेमध्ये तपासले असता, चेंडू यष्ट्यांना स्पर्श करून गेल्याचे स्पष्ट झाले आणि श्रेयंकाला 'बोल्ड' घोषित करण्यात आले.
एकाच षटकात अरुंधती रेड्डी आणि श्रेयंका पाटील या दोन फलंदाजांना बाद करून निकोला कॅरीने मुंबई इंडियन्सचा विजय जवळपास निश्चित केला आहे. श्रेयंका केवळ २ चेंडू खेळून १ धाव करून माघारी परतली.
मुंबई इंडियन्सने सामन्यावर पुन्हा एकदा आपली पकड घट्ट केली आहे. आरसीबीचा डाव सावरण्याचा प्रयत्न करणारी अरुंधती रेड्डी १६.१ व्या षटकात बाद झाली असून, निकोला कॅरीने मुंबईला हे महत्त्वाचे यश मिळवून दिले आहे.
'स्टॅट्युटोरिक टाईम-आऊट'नंतर पडलेल्या पहिल्याच चेंडूवर निकोला कॅरीने अरुंधतीला जाळ्यात अडकवले. कॅरीने टाकलेल्या 'लो फुल टॉस' चेंडूवर अरुंधतीने 'मिड-विकेट'च्या दिशेने जोरदार प्रहार केला. चेंडू अत्यंत वेगाने सीमारेषेकडे जात होता, मात्र तिथे तैनात असलेल्या अमेलिया केरने अत्यंत शांतचित्ताने झेल टिपला. झेल घेतल्यावर वेगामुळे तिचा तोल थोडा मागे गेला, मात्र सीमारेषेला स्पर्श न करता तिने स्वतःला सावरले.
DRS मुळे मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत अरुंधतीने २५ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने २० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. नादिन डी क्लार्कसोबत तिने केलेली भागीदारी आरसीबीच्या आशा जिवंत ठेवत होती, मात्र तिच्या जाण्याने आरसीबी पुन्हा एकदा अडचणीत आली आहे.
आरसीबीची धावसंख्या १५ षटकांअखेर ५ बाद १११
आरसीबीची धावसंख्या ९ षटकांअखेर ५ बाद ७२
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची फलंदाजी आज पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळताना दिसत आहे. अमेलिया केरने आपल्या पहिल्याच षटकात धुमाकूळ घालत आरसीबीची सर्वात मोठी आशा असलेल्या ऋचा घोषलाही तंबूत धाडले आहे. यासह आरसीबीचा निम्मा संघ आता तंबूत परतला आहे.
७.४ व्या षटकात अमेलिया केरने चेंडू हवेत थोडा संथ (Toss up) टाकून ऋचाला मोठा फटका मारण्याचे आमंत्रण दिले. ऋचाने चेंडू 'लॉन्ग-ऑफ'च्या डोक्यावरून भिरकावून देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या निकोला कॅरीने हवेत उडी मारून डोक्याच्या वर एक विस्मयकारक झेल टिपला. सीमारेषेच्या अगदी जवळ असतानाही कॅरीने आपला तोल सांभाळला आणि ऋचाची ६ धावांची खेळी संपुष्टात आणली.
आरसीबीची भीषण अवस्था: सुरुवातीला मजबूत वाटणारा आरसीबीचा संघ आता पूर्णपणे कोलमडला आहे. एकाच षटकात दोन विकेट्स घेत अमेलिया केरने मुंबई इंडियन्सची पकड मजबूत केली आहे.
मुंबई इंडियन्सची स्टार अष्टपैलू खेळाडू अमेलिया केरने फलंदाजीतील अपयशाचा वचपा गोलंदाजीत काढला आहे. आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर केरने राधा यादवला चकवत आरसीबीला चौथा आणि अत्यंत धक्कादायक तडाखा दिला.
७.१ षटकात अमेलिया केरने एक अप्रतिम 'गुगली' टाकला. राधा यादवला या चेंडूचा अजिबात अंदाज आला नाही. ती चेंडू खेळण्यासाठी पुढे सरसावली, पण चेंडूने तिला हुलकावणी देत बॅटच्या आतून जात थेट 'मिडल स्टंप'चा वेध घेतला. दांड्या गुल झाल्याचे पाहून राधा यादव काही काळ अवाक होऊन उभी होती.
एकेकाळी ३ षटकांत बिनबाद ४० धावांवर असलेला आरसीबीचा संघ आता ६३ धावांवर ४ बाद अशा केविलवाण्या स्थितीत पोहोचला आहे. ४०/० ते ६३/४ असा हा प्रवास आरसीबीच्या फलंदाजीची दुबळी बाजू स्पष्ट करत आहे.
विजयासाठी १५१ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा डाव चांगलाच गडगडला आहे. स्मृती मंधाना आणि ग्रेस हॅरिस पाठोपाठ आता दयालन हेमलताही स्वस्तात माघारी परतल्याने आरसीबीच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईची अष्टपैलू खेळाडू अमनजोत कौरने हेमलताला बाद करत आरसीबीला तिसरा धक्का दिला.
६.४ व्या षटकात अमनजोत कौरने यष्ट्यांच्या रेषेत एक सरळ चेंडू टाकला. हेमलताने चेंडूचा अंदाज न घेता आपला पुढचा पाय रेषेत आणला आणि फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू थेट पॅडवर आदळला. यष्ट्यांच्या बरोबर रेषेत चेंडू असल्याने पंचांनी फलंदाजाला बाद ठरवण्यास वेळ लावला नाही. विशेष म्हणजे, आपण पूर्णपणे बाद आहोत याची खात्री पटल्याने हेमलताने 'रिव्ह्यू' न घेता तंबूचा रस्ता धरला.
दयालन हेमलताने १२ चेंडूंत केवळ एका चौकारासह ७ धावा केल्या. अवघ्या ७ षटकांच्या आत तीन महत्त्वाचे फलंदाज गमावल्यामुळे आरसीबी आता पूर्णपणे दबावाखाली आहे. आता मैदानावर असलेल्या ऋचा घोषवर डावाची संपूर्ण भिस्त अवलंबून आहे.
सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने सामन्याचे चित्र पालटले आहे. सुरुवातीच्या ३ षटकांत बिनबाद ४० धावा करून आरसीबी भक्कम स्थितीत वाटत असतानाच, मुंबईच्या गोलंदाजांनी अवघ्या २ षटकांत दोन मोठे बळी घेत आरसीबीला बॅकफूटवर ढकलले आहे. स्मृती मंधानानंतर आता आक्रमक फलंदाज ग्रेस हॅरिसही बाद झाली आहे.
४.६ व्या षटकात नॅट सायव्हर-ब्रंटने आरसीबीला हा मोठा धक्का दिला. तिने ऑफ स्टंपच्या जवळ 'फुल लेन्थ' चेंडू टाकला, ज्यावर हॅरिसने 'लॉफ्टेड शॉट' खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅटचा चेंडूशी नीट संपर्क न झाल्याने तो सरळ लॉन्ग-ऑनच्या दिशेने हवेत उडाला. तिथे क्षेत्ररक्षण करत असलेली शबनीम इस्माईल चेंडू टिपताना घसरली, तरीही तिने अत्यंत चिकाटीने हा झेल पूर्ण केला.
पहिल्या ३ षटकांत ४० धावा देणाऱ्या मुंबईने पुढच्या २ षटकांत केवळ ७ धावा देत २ बळी मिळवले आहेत. हॅरिसने १२ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकारासह २५ धावा केल्या. एकापाठोपाठ एक दोन बळी मिळाल्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौरच्या चेहऱ्यावरील हास्य मुंबईचे सामन्यातील पुनरागमन अधोरेखित करत आहे.
मुंबई इंडियन्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची सुरुवात खराब झाली आहे. मुंबईची अनुभवी वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने आपल्या भेदक माऱ्याने आरसीबीची कर्णधार स्मृती मंधानाला तंबूत धाडून संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले.
३.५ व्या षटकात इस्माईलने स्मृतीवर जबरदस्त दडपण निर्माण केले होते. सलग चार चेंडू निर्धाव टाकल्यानंतर, स्मृतीने हे दडपण झुगारण्यासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. ती क्रिझच्या थोडे पुढे आली आणि इस्माईलच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर 'क्रॉस बॅट' शॉट खेळली. मात्र, चेंडू बॅटच्या वरच्या टोकाला लागून मिड-ऑनच्या दिशेने हवेत उडाला. तिथे उभ्या असलेल्या पूनम खेमनारने कोणतीही चूक न करता हा सोपा झेल टिपला.
स्मृती मंधानाने १३ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने १८ धावा केल्या. इस्माईलने ज्या पद्धतीने आपल्या लेंथमध्ये बदल करून स्मृतीला जाळ्यात अडकवले, ते पाहून मुंबईच्या संघात उत्साहाचे वातावरण आहे. स्मृती बाद झाल्यामुळे आरसीबीचा डाव आता अडचणीत आला असून, डावाची सर्व सूत्रे आता अनुभवी खेळाडूंच्या हाती आहेत.
महिला प्रीमियर लीगच्या सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने संकटातून सावरत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) समोर एक आव्हानात्मक धावसंख्या उभी केली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने निर्धारित २० षटकांत १५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, रात्रीच्या वेळी पडणारे दव पाहता हे लक्ष्य आरसीबीला रोखण्यासाठी पुरेसे ठरेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
लॉरेन बेलचा भेदक मारा आणि मुंबईची खराब सुरुवात
सामन्याच्या सुरुवातीला आरसीबीच्या लॉरेन बेलने आपल्या अचूक टप्प्याने मुंबईच्या फलंदाजांना चांगलेच ग्रासले. तिने अमेलिया केरला आपल्या स्विंगवर वारंवार चकवले. अनेकदा चेंडू हुकल्याने हतबल झालेली केर अखेर पॉवरप्लेमध्येच बेलची शिकार ठरली. त्यानंतर अनुभवी नॅट सायव्हर-ब्रंट सातव्या षटकात यष्टीचीत झाल्यामुळे मुंबईचा संघ मोठ्या दबावाखाली आला होता.
कर्णधार हरमनप्रीत आणि कमालिनीची भागीदारी
दोन महत्त्वाचे बळी झटपट गमावल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जी. कमालिनी यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. या जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत मुंबईच्या डावाला स्थिरता मिळवून दिली आणि धावगतीला पुन्हा वेग दिला.
सजीवन सजना आणि निकोला कॅरीची फटकेबाजी
मुंबईच्या डावाचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे सजीवन सजना आणि निकोला कॅरी यांच्यातील पाचव्या विकेटसाठीची भागीदारी. सजनाला आरसीबीच्या क्षेत्ररक्षकांनी दोनदा जीवनदान दिले, ज्याचा तिने पुरेपूर फायदा उठवला. अखेरच्या षटकांत सजनाने गिअर बदलत मुंबईला १५० धावांच्या पार पोहोचवले.
नादिन डी क्लार्कचा 'स्पेशल स्पेल'
आरसीबीकडून नादिन डी क्लार्क आज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने केवळ २६ धावांच्या मोबदल्यात मुंबईचे ४ फलंदाज तंबूत धाडले. तिला लॉरेन बेलने उत्तम साथ दिली, जिने केवळ १ बळी मिळवला असला तरी तिचा इकॉनॉमी रेट अत्यंत प्रभावी राहिला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची गोलंदाज नादिन डी क्लार्कने आज मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचे अक्षरशः लचके तोडले आहेत. १९.५ व्या षटकात निकोला कॅरीला बाद करत डी क्लार्कने या सामन्यातील आपला चौथा बळी मिळवला आणि मुंबईला मोठे खिंडार पाडले.
नादिनने ऑफ स्टंपच्या बाहेर 'फुल आणि वाईड' चेंडू टाकला. या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात निकोला कॅरीने बॅट जोरात फिरवली, मात्र चेंडू बॅटची जाड बाहेरील कडा (Thick edge) घेऊन 'शॉर्ट थर्ड'च्या दिशेने गेला. तिथे उभ्या असलेल्या हेमलताने अत्यंत शिताफीने हा झेल टिपला. निकोला कॅरी बाद होताच मुंबईची मोठी धावसंख्या उभारण्याची आशा मावळली.
निकोला कॅरीने २९ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ४० धावांची संयमी आणि महत्वपूर्ण खेळी केली. नादिन डी क्लार्कच्या या भेदक गोलंदाजीमुळे (४ विकेट्स) आरसीबीने मुंबईला कमी धावसंख्येत रोखण्यात यश मिळवले आहे.
मुंबई इंडियन्सचा डाव सावरणाऱ्या सजीवन सजनाचा अडथळा अखेर आरसीबीने दूर केला आहे. १९.१ षटकात सजना बाद झाल्याने मुंबईच्या सन्मानजनक धावसंख्या उभारण्याच्या आशांना खीळ बसली आहे. नादिन डी क्लार्कने या महत्त्वपूर्ण विकेटसह मुंबईच्या डावाला खिंडार पाडले.
डावाच्या शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सजनाने आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न केला. तिने चेंडू 'डीप मिड-ऑफ'च्या दिशेने हवेत उडवला. चेंडू हवेत असतानाच आरसीबीची कर्णधार स्मृती मंधानाने मागे धावत (Back-pedalling) अत्यंत संयमाने एक सुरक्षित झेल टिपला. स्मृतीच्या या चपळाईमुळे सजनाच्या वादळी खेळीचा अंत झाला.
सजीवन सजनाने २५ चेंडूंत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४५ धावांची अत्यंत स्फोटक आणि प्रेक्षणीय खेळी केली. ती बाद होताच उजव्या हाताची फलंदाज अमनजोत कौर मैदानात आली आहे. शेवटच्या पाच चेंडूंमध्ये मुंबई किती धावांची भर टाकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१९व्या षटकाअखेर मुंबई इंडियन्सची धावसंख्या ४ बाद १४९
१५व्या षटकाअखेर मुंबई इंडियन्सची धावसंख्या ४ बाद १००
१४व्या षटकाअखेर मुंबई इंडियन्सची धावसंख्या ४ बाद ८५
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या गोलंदाजांनी आज मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आहे. जी. कमालिनी बाद झाल्यानंतर पाठोपाठ मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरही बाद झाल्याने मुंबईचा संघ पूर्णपणे बॅकफुटवर गेला आहे. नादिन डी क्लार्कने हरमनप्रीतला बाद करत आरसीबीला मोठे यश मिळवून दिले.
१०.६ व्या षटकात नादिन डी क्लार्कने ऑफ स्टंपच्या बाहेर थोडा संथ गतीने चेंडू टाकला. हा चेंडू ड्राईव्ह करण्याच्या नादात हरमनप्रीतने बॅट लावली, परंतु चेंडू बॅटची बाहेरील कडा घेऊन थेट यष्टिरक्षक रिचा घोषच्या हातात विसावला. रिचाने कोणतीही चूक न करता हा सोपा झेल टिपला आणि हरमनप्रीतची खेळी संपुष्टात आली.
हरमनप्रीत कौरने १७ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २० धावा केल्या. स्थिरावलेले दोन्ही फलंदाज (कमालिनी आणि हरमनप्रीत) झटपट बाद झाल्यामुळे आरसीबी आता 'ड्रायव्हर सीट'वर आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची वेगवान गोलंदाज लॉरेन बेलने आजच्या सामन्यात आपल्या धारदार गोलंदाजीने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवले. बेलने आपल्या कोट्यातील षटकांमध्ये तब्बल १९ 'डॉट बॉल्स' टाकत डब्ल्यूपीएल (WPL) इतिहासात एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
एका डावात सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याच्या विक्रमात आता लॉरेन बेल संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. या यादीत अव्वल स्थानी मुंबई इंडियन्सची शबनीम इस्माइल असून, तिने २०२५ मध्ये बडोदा येथे गुजरात जायंट्सविरुद्ध २० चेंडू निर्धाव टाकण्याचा पराक्रम केला होता.
WPL डावात सर्वाधिक निर्धाव चेंडू:
शबनीम इस्माइल (MI) : २० चेंडू (विरुद्ध गुजरात जायंट्स, २०२५)
लॉरेन बेल (RCB) : १९ चेंडू (विरुद्ध मुंबई इंडियन्स, आज)
बेलच्या या कंजूस गोलंदाजीमुळे मुंबईच्या धावगतीला मोठा लगाम बसला असून, आरसीबीच्या विजयाची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सची अवस्था बिकट होत असून, अनुभवी फलंदाज नॅट सायव्हर-ब्रंट केवळ ४ धावा करून बाद झाली. आरसीबीची गोलंदाज नादिन डी क्लार्क आणि यष्टिरक्षक रिचा घोष यांनी आपल्या हुशारीने मुंबईला हा दुसरा मोठा हादरा दिला.
डावातील ६.२ षटकात नादिन डी क्लार्कने चेंडू थोडा पुढे टाकला (Pitched up), ज्यावर सायव्हर-ब्रंटने ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू तिच्या पॅडला लागून यष्टिरक्षक रिचा घोषच्या हातात गेला. यावेळी सायव्हर-ब्रंटचा मागचा पाय क्रीजच्या बाहेर असल्याचे पाहताच, रिचाने विजेच्या वेगाने यष्ट्या उडवल्या.
गेल्या हंगामात खोऱ्याने धावा ओढणाऱ्या नॅट सायव्हर-ब्रंटला आज केवळ एका चौकारासह ४ धावांवर समाधान मानावे लागले. डी क्लार्कच्या या अचूकतेमुळे आरसीबीने सामन्यावरील आपले नियंत्रण अधिक मजबूत केले आहे.
अमेलिया केरची विकेट पडल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ दडपणाखाली येईल असे वाटत असतानाच, सलामीवीर जी. कमालिनीने आक्रमक फटकेबाजी करत आरसीबीच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवला. डावातील ५ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या फिरकीपटू लिन्सी स्मिथला कमालिनीने लक्ष्य केले.
या षटकात कमालिनीने आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवत तीन शानदार चौकार खेचले. लिन्सी स्मिथच्या गोलंदाजीवर मुंबईने एकूण १३ धावा वसूल करत धावगतीला पुन्हा एकदा वेग दिला आहे. पॉवरप्लेमध्ये ही फटकेबाजी मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत महत्त्वाची ठरली.
मैदानावर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवणाऱ्या लॉरेन बेलने अखेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या गोटात आनंदाची लाट आणली आहे. पॉवरप्लेमध्ये सलग तीन षटके अमेलिया केरला आपल्या तालावर नाचवल्यानंतर, बेलने ४.६ षटकात तिला बाद करत मुंबई इंडियन्सला पहिला मोठा धक्का दिला.
लॉरेन बेलने टाकलेल्या अचूक टप्प्यामुळे अमेलिया केर सुरुवातीपासूनच धावांसाठी संघर्ष करत होती. १५ चेंडूत केवळ ४ धावा केल्यामुळे केर प्रचंड दबावात होती. हा दबाव झुगारण्यासाठी तिने बेलच्या चेंडूवर पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटच्या मधोमध न लागता हवेत उडाला. कव्हर क्षेत्रात उभ्या असलेल्या अरुंधती रेड्डीने कोणताही चुकीचा न करता एक सोपा झेल टिपला आणि केरची 'रस्टी' खेळी संपुष्टात आली.
बेलच्या या भेदक गोलंदाजीमुळे आरसीबीने सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे.
संक्षिप्त धावफलक :
अमेलिया केर : ४ धावा (१५ चेंडू)
बाद : झे. अरुंधती रेड्डी, गो. लॉरेन बेल
सामन्याच्या सुरुवातीलाच अचूक टप्पा आणि प्रभावी वेग यांच्या जोरावर गोलंदाजाने फलंदाजावर वर्चस्व गाजवले, की सामन्याचे चित्र पालटते. आजच्या सामन्यात नेमका असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाज बेलने आपल्या स्पेलची सुरुवात चक्क 'मेडन ओव्हर'ने करून प्रतिस्पर्धी संघावर दडपण निर्माण केले.
डावाच्या पहिल्याच षटकापासून बेलने अत्यंत शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन केले. 'ऑफ स्टंप'च्या रेषेत फुल लेन्थ चेंडू टाकून तिने न्यूझीलंडची स्टार फलंदाज अमेलिया केरला हात खोलण्याची एकही संधी दिली नाही. बेलचा चेंडू ज्या पद्धतीने स्विंग होत होता, त्यासमोर एक जागतिक दर्जाची फलंदाज असूनही केरला चेंडू बॅटवर घेण्यासाठी संघर्ष करावा लागला.
षटकातील सलग पाच चेंडूंवर कोणतीही धाव न मिळाल्याने केरवर मानसिक दडपण स्पष्टपणे जाणवत होते. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तिने कसाबसा बॅटचा संपर्क साधला आणि चेंडू 'कव्हर-पॉइंट'च्या दिशेने ढकलला. मात्र, तिथे उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने चेंडू चपळाईने अडवल्याने हे षटक निर्धाव राहिले.
एखाद्या मोठ्या सामन्यात किंवा पॉवरप्लेमध्ये निर्धाव षटकाने सुरुवात होणे, हे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी मोठी रणनीतिक आघाडी मानली जाते. आता या दबावाचा फायदा घेऊन बेल पुढच्या षटकांमध्ये बळी मिळवण्यात यशस्वी ठरते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
पहिल्याच षटकात लॉरेन बेलने निर्धाव षटक टाकत आरसीबीला आश्वासक सुरुवात करून दिली. आता मुंबईचे फलंदाज या दबावातून सावरून किती धावांचे आव्हान उभे करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई इंडियन्स महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जी. कमालिनी, नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, अमनजोत कौर, निकोला कॅरी, पूनम खेमनार, शबनीम इस्माइल, संस्कृती, सजीवन सजना, सायका इशाक.
रॉयल चैलेंजर्स बेंगळुरू महिला संघ : स्मृती मंधाना (कर्णधार), ग्रेस हॅरिस, दयालन हेमलता, ऋचा घोष (यष्टिरक्षक), राधा यादव, नादिन डी क्लार्क, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, प्रेमा रावत, लिन्सी स्मिथ, लॉरेन बेल.
महिला प्रीमियर लीगच्या (WPL) चौथ्या हंगामाचा बिगुल वाजला असून, पहिल्याच थरारक सामन्यात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने टॉस जिंकला आहे. घरच्या मैदानावरील प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आरसीबीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असून, गतविजेत्या मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळच्या वेळी पडणारे दव लक्षात घेता, स्मृती मंधानाने लक्ष्याचा पाठलाग करण्याला पसंती दिली आहे. दुसरीकडे, हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारून आरसीबीवर दडपण निर्माण करण्याची संधी असेल. दोन्ही संघांनी आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला असून, अनेक युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.