पुढारी ऑनलाईन डेस्क : Women's T20 World Cup : बीसीसीआयने मंगळवारी महिला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली. हरमनप्रीत कौरकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. स्मृती मंधानाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. 3 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे.
बीसीसीआयनेच्या महिला निवड समितीने एकूण 20 खेळाडूंची निवड केली आहे. त्यापैकी 15 खेळाडू मुख्य संघाचा भाग आहेत आणि 5 खेळाडू राखीव म्हणून निवडले गेले आहेत. तीन खेळाडू संघासोबत प्रवास करू शकतात, तर दोन खेळाडू स्टँड बाय मोडवर असतील. कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यास त्या खेळाडूला यूएईलाही पाठवले जाऊ शकते.
सध्या संघाचे दोन खेळाडू जखमी झाले आहेत. त्यापैकी एक यष्टीरक्षक यास्तिका भाटिया आणि दुसरी गोलंदाज श्रेयंका पाटील आहे. जर त्या तंदुरुस्त नसतील तर राखीव खेळाडूंमधून कोणतेही दोन खेळाडू अंतिम पंधरामध्ये निवडले जाऊ शकतात. मात्र, सध्यातरी या दोन्ही खेळाडूंना 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी अंतिम 15 मध्ये ठेवण्यात आले आहे, तर उमा छेत्री (यष्टीरक्षक), तनुजा कंवर आणि सायमा ठाकोर यांना ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी, निवडकर्त्यांनी राघवी बिश्त आणि प्रिया मिश्रा यांना नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व्हमध्ये ठेवले आहे.
आयसीसीने सोमवारी आगामी महिला टी-20 विश्वचषकाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. स्पर्धेसाठी 10 संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांचा अ गटात समावेश आहे. तर ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड हे संघ आहेत. प्रत्येक संघ चार गट सामने खेळेल. भारतीय महिला संघ 6 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. 20 ऑक्टोबर रोजी दुबईत अंतिम सामना रंगणार आहे.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन.
ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह खेळाडू : उमा छेत्री (विकेटकीपर), तनुजा कंवर, सायमा ठाकोर.
नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह खेळाडू : राघवी बिस्त, प्रिया मिश्रा.