स्पोर्ट्स

Women T20 Challenge : शेतकर्‍याची लेक गाजवणार मैदान!

Arun Patil

अहमदनगर ; वृत्तसंस्था : अहमदनगर जिल्ह्यातील छोट्याशा गावची रहिवासी असलेल्या आरती केदार या तरुणीने थेट आयपीएल स्पर्धेत (Women T20 Challenge) धडक मारली आहे. पाथर्डीच्या हात्राळसारख्या छोट्याशा गावात महिला क्रिकेटसाठी कोणतेही वातावरण नसताना आरती केदारने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत परिश्रम घेत क्रिकेटसारख्या मोठ्या स्पर्धेच्या खेळामध्ये कौशल्य प्राप्त करून यश संपादले आहे.

मनापासून क्रिकेटची आवड असली तरी आरती प्रत्यक्षात 2014 पासून क्रिकेट खेळू लागली. खेळातील सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर हात्राळसारख्या छोट्या गावात सराव करूनही महाराष्ट्राच्या संघात तिने आपले स्थान पक्के केले आहे. पुद्दुचेरी येथे नुकत्याच झालेल्या महिला रणजी सामन्यात आरतीने सर्वाधिक बळी घेण्याची कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर आता आरतीची निवड आयपीएल स्पर्धेतील व्हेलोसिटी संघात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून करण्यात आली आहे.

शेतकरी कुटुंबातील आरती आपल्या गावात फारशा सुविधा नसल्या तरी क्रिकेटसाठी रोज चार तासांचा सायकल प्रवास करून पाथर्डी येथे सरावासाठी येत होती. ग्रामीण भागातील बिकट परिस्थितीला आणि विरोधाला तोंड देत तिने आपला सराव व मेहनत कायम ठेवली. त्यामुळे तिला हे यश प्राप्त झाले. पाथर्डी शहरासाठी भारताची जर्सी मिळवणे हे आमचे स्वप्न आहे आणि आरती हे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास पाथर्डीतील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. (Women T20 Challenge)

ग्रामीण भागातील मुलींना अनेक क्षेत्रांमध्ये नाव कमावण्याची इच्छा असते. मात्र, सभोवतालची परिस्थिती अनेकदा पोषक नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, न्यूनगंड न बाळगता मेहनत आणि जिद्दीच्या जोरदार कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते हाच संदेश आरतीने दिला आहे.

SCROLL FOR NEXT