न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाच्या विजयात प्रतीका रावल आणि स्मृती मानधना यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. दोन्ही खेळाडूंनी शतके झळकावून भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्यानंतर गोलंदाजांनी अचूक मारा करत भारतीय संघाचे उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.
गुरुवारी (२३ ऑक्टोबर) नवी मुंबई येथील डीवाय पाटील ॲकॅडमीच्या स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारताने डिएलएस नियमानुसार न्यूझीलंडवर ५३ धावांनी विजय मिळवला. पावसामुळे या सामन्यात न्यूझीलंडला ४४ षटकांत ३२५ धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु त्यांना ८ गड्यांच्या मोबदल्यात २७१ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघांनी यापूर्वीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत स्थान मिळवू शकले नाहीत.
भारतीय संघाने स्पर्धेची सुरुवात शानदार पद्धतीने करत श्रीलंका आणि पाकिस्तानवर विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध झालेल्या सलग तीन पराभवांमुळे उपांत्य फेरीच्या आशांना धक्का बसला होता. अशा परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता, जिथे हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघाने नेत्रदीपक विजय मिळवला. भारतीय संघ आता साखळी टप्प्यातील आपल्या शेवटच्या सामन्यात २६ ऑक्टोबर रोजी बांगलादेशचा सामना करेल.
भारतीय महिला संघ आता ३० ऑक्टोबर रोजी डीवाय पाटील स्टेडियमवरच आपला उपांत्य फेरीचा सामना खेळेल. तथापि, भारताचा उपांत्य फेरीत कोणाशी मुकाबला होईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. भारत आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशला हरवले तरी, तो गुणतालिकेत चौथ्या स्थानावरच राहील. भारताला गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या संघाशी उपांत्य फेरीत खेळावे लागणार आहे.
गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया (११ गुण) अव्वल तर द. आफ्रिका (१० गुण) दुस-या स्थानी आहे. या दोन्ही संघांमध्ये लढत होणे बाकी आहे. हा सामना २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, त्या संघाचे भारतासमोर आव्हान असेल. पण जर ऑस्ट्रेलिया विरुद्ध द. आफ्रिकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला तरी कांगारू अव्वल स्थानी कायम राहतील आणि पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात थोडक्यात सांगायचे झाल्यास, ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेपैकी जो संघ गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त करेल, तो उपांत्य फेरीत भारताशी खेळेल. पहिली उपांत्य फेरी २९ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे होणार आहे, ज्यात इंग्लंड संघाचा सहभाग निश्चित आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाज स्मृती मानधना आणि प्रतीका रावल यांनी पहिल्या गड्यासाठी २१२ धावांची भागीदारी रचली. प्रतीकाने १२२ आणि मानधनाने १०९ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्सनेही नाबाद ७६ धावांची वादळी खेळी केली, ज्यामुळे भारताने ४९ षटकांत ३४०/३ अशी मोठी धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ कधीही लयीत दिसला नाही. ब्रूक हॉलिडे (८१ धावा) आणि इझाबेला गेझ (६५ धावा) या दोघीच खेळपट्टीवर टिकू शकल्या. आता भारतीय महिला संघ आपल्या पहिल्या विश्वचषक विजेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. आता त्यांना उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.