प्रतीका रावल हिला आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचे विजयी पदक मिळणार असल्याची माहिती आता निश्चित झाली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या महत्त्वपूर्ण हस्तक्षेपानंतर हा बदल करण्यात आला असून, खुद्द प्रतीका रावल हिनेच याचा खुलासा केला आहे.
आयसीसीच्या नियमानुसार, विश्वचषक विजेतेपदाचे पदक केवळ संघातील १५ खेळाडूंनाच (जे चमूचा भाग असतात) दिले जाते. मात्र, प्रतीका रावल हिच्याबाबतीत आयसीसीला आपला हा नियम बदलावा लागला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर प्रतीका रावल हिला बांगलादेशविरुद्धच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की तिला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर तिच्या जागी शेफाली वर्माचा संघात समावेश करण्यात आला. शेफालीने अंतिम सामन्यात ८७ धावांची शानदार खेळी करत भारताला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
संघाचा भाग असल्याने शेफालीला केवळ दोन सामने खेळूनही विश्वचषक विजेत्याचे पदक मिळाले. परंतु, साखळी फेरीत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रतीका रावल ही मात्र पदकापासून वंचित राहिली होती. प्रतीकाने साखळी फेरीत एका शतकासह ३०० हून अधिक धावा फटकावल्या होत्या आणि सलामीची साथीदार स्मृती मानधना सोबत अनेक महत्त्वाच्या भागीदारी रचल्या.
प्रतीका रावल हिला पदक न मिळाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आवाज उठवला. भारताच्या विजयातील तिच्या योगदानासाठी आयसीसीवर दबाव आणला गेला. आता प्रतीका रावल यांनी स्वतःच उघड केले आहे की, जय शहा यांच्या हस्तक्षेपामुळे तिला पदक मिळणार आहे.
प्रतीका रावलने सांगितले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत भारतीय संघाच्या भेटीदरम्यान मी ज्या पदकासोबत छायाचित्र घेतले होते, ते पदक संघाच्या सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याने तात्पुरते दिले होते. पण यापुढे माझे स्वत:चे एक पदक असणार आहे. आयसीसी प्रमुख जय शहा हे मला पदक मिळवून देणार आहेत. यासाठी ते आयसीसीच्या नियमात बदल करण्यास प्रयत्नशील आहेत. त्यांनी याबाबत संघाच्या व्यवस्थापकांना कळवले आहे,’ असा तिने खुलासा केला.
‘पहिल्यांदा जेव्हा मी सपोर्ट स्टाफने दिलेले पदक उघडले आणि त्याकडे पाहिले, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी सहसा जास्त रडणारी व्यक्ती नाही, पण त्याक्षणी मला अश्रू अनावर झाले,’ अशी भावनाही प्रतीका रावल हिने व्यक्त केली.