Women s ODI World Cup India squad announced
आगामी महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून स्फोटक सलामीवीर शफाली वर्माला वगळण्यात आले असून, मागील काही काळातील तिच्या असमाधानकारक कामगिरीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेसाठी निवड समितीने अनुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. संघाच्या कर्णधारपदाची धुरा हरमनप्रीत कौर सांभाळेल, तर उपकर्णधार म्हणून स्मृती मानधना हिची निवड करण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या काही नवीन चेहऱ्यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे.
भारतीय संघाची प्रमुख सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा हिला संघातून वगळण्यात आले आहे. निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी तिला संघात संधी दिली होती, मात्र ती आपली छाप पाडण्यात अपयशी ठरली. त्या दौऱ्यात तिच्या बॅटमधून केवळ ३, ४७, ३१ आणि ७५ धावा निघाल्या होत्या. तसेच, ऑस्ट्रेलिया 'अ' संघाविरुद्ध तिने ३, ३ आणि ४१ धावांची खेळी केली होती. याउलट, स्मृती मानधना आणि प्रतिका रावळ या सलामीच्या जोडीने सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे विश्वचषकासाठी निवड समितीने मानधना-रावळ जोडीवरच विश्वास दर्शवला आहे.
भारतीय महिला संघाने अद्याप एकदाही विश्वचषक जिंकलेला नाही. तथापि, संघाने दोनदा (२००५ आणि २०१७) विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु दोन्ही वेळेस संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली. यावेळेस भारतीय संघात हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, प्रतिका रावळ, हरलीन देओल आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांसारख्या फलंदाजांचा समावेश आहे, तर गोलंदाजीची धुरा रेणुका सिंग, अरुंधती रेड्डी, राधा यादव आणि स्नेह राणा यांसारख्या खेळाडू सांभाळतील.
महिला विश्वचषक २०२५ मध्ये यजमानांसह एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. भारतीय महिला संघाचा पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी श्रीलंका संघाविरुद्ध होणार आहे.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावळ, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (यष्टीरक्षक), क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), स्नेह राणा