स्पोर्ट्स

IND W vs PAK W Match : कोलंबोत जिंकल्या भारताच्या रणरागिणी! कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 88 धावांनी मात

Women ODI World Cup : महिला गटातही ठेचला पाकचा अहंकार, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या.

रणजित गायकवाड

कोलंबो : काही दिवसांपूर्वीच आशिया स्पर्धेत पुरुष गटात भारताने पाकिस्तानला तब्बल तीनवेळा चारीमुंड्या चीत केल्याचे वर्तमान ताजे असताना त्याचाच कित्ता भारतीय महिला संघानेही आता गाजवला आहे. कोलंबोत झालेल्या आयसीसी महिला वन डे विश्वचषकातील साखळी सामन्यात रविवारी भारताने पाक ला 88 धावांनी धूळ चारण्याचा भीमपराक्रम गाजवला. प्रारंभी, भारताने 50 षटकांत सर्वबाद 247 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव 43 षटकांत सर्वबाद 159 धावांतच गारद झाला.

विजयासाठी 248 धावांचे आव्हान असताना क्रांती गौड (3/20) व दीप्ती शर्मा (3/45) यांनी एकत्रित 6 गडी गारद करत पाकिस्तानी फलंदाजीचे अक्षरश: कंबरडे मोडले. त्यांना स्नेह राणाने 38 धावांत 2 बळींसह समयोचित साथ दिली. पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना रनिंग बिटविन द विकेटस्मधील गोंधळामुळे धावचीत होत परतावे लागले. सिदरा अमिनने 106 चेंडूंत 81 तर नतालिया परवेझने 46 चेंडूंत 33 धावा केल्या. मात्र, या दोघी बाद झाल्यानंतर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आल्यात जमा होते. भारताची या स्पर्धेतील पुढील लढत गुरुवारी (दि. 9 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे होणार आहे.

तत्पूर्वी, आयसीसी महिला वन डे विश्वचषक स्पर्धेतील बहुप्रतीक्षित आणि हाय-व्होल्टेज सामन्यात, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत सर्वबाद 247 धावा उभारल्या. येथील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित या लढतीत भारतातर्फे हरलीन देओलने सर्वाधिक 46 धावा केल्या तर रिचा घोषने डावाच्या उत्तरार्धात 20 चेंडूंत जलद 35 धावा फटकावल्या. जेमिमाह रॉड्रिग्जनेही 37 चेंडूंत 32 धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना, भारताची सुरुवात सावध, पण आश्वासक झाली. सलामीवीर स्मृती मानधना (23) आणि प्रतीका रावळ (31) यांनी चांगली सुरुवात करून दिली, पण मोठी खेळी साकारण्यात त्या अपयशी ठरल्या. त्यानंतर, तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हरलीन देओलने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तिने अत्यंत संयमी आणि महत्त्वपूर्ण खेळी करत 65 चेंडूंत 46 धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मात्र, तिचे अर्धशतक अवघ्या चार धावांनी हुकल्याने भारताला मोठा धक्का बसला.

मधल्या फळीत भारताची धावगती मंदावली. कर्णधार हरमनप्रीत कौर (19) आणि जेमिमाह रॉड्रिग्ज (32) यांना चांगली सुरुवात मिळूनही त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. त्यानंतर दीप्ती शर्मा (25) आणि स्नेह राणा (20) यांनीही छोटेखानी योगदान दिले, पण पाकिस्तानच्या शिस्तबद्ध मार्‍यापुढे भारतीय फलंदाज धावा जमवण्यासाठी संघर्ष करताना दिसले. नल्लापुरेड्डी चरणी (1), क्रांती गौड (8) आणि रेणुका सिंग (0) झटपट बाद झाल्याने भारताचा संघ काही काळ गडगडला होता. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोषने केलेल्या स्फोटक फलंदाजीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. रिचाने केवळ 20 चेंडूंत तीन चौकार आणि दोन गगनचुंबी षटकारांसह नाबाद 35 धावांची तुफानी खेळी केली. तिच्या या आक्रमक खेळीमुळेच भारतीय संघ 247 धावांपर्यंत पोहोचू शकला.

पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज डायना बेग सर्वात यशस्वी ठरली. तिने 10 षटकांत 69 धावा देत चार महत्त्वपूर्ण बळी घेतले. तिला साथ देत कर्णधार फातिमा साना आणि सादिया इक्बाल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर नशरा संधू आणि रमीन शाह यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

पाकिस्तानची आठवी विकेट

४० व्या षटकात पाकिस्तानने आठवी विकेट गमावली. स्नेह राणाने सदीरा अमीनला बाद केले. सदीराने १०६ चेंडूत ८१ धावा केल्या. तिने तिच्या डावात नऊ चौकार आणि एक षटकार मारला.

रामीन शमीम शून्यावर बाद

भारताविरुद्ध रामीन शमीम आपले खाते उघडू शकली नाही. यासह पाकिस्तानने त्यांची सातवा विकेट गमावली.

३८ व्या षटकात पाकिस्तानने सहावी विकेट गमावली. स्नेह राणाने सिद्राला बाद केले.

पाकिस्तानचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये

पाकिस्तानचा अर्धा संघ १०२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाची भारतासमोर फेल ठरली. तिने १५ चेंडूत फक्त दोन धावा काढल्या.

पाकिस्तानला चौथा धक्का

क्रांती गौडने नतालिया परवेझला बाद केले आणि परवेझ आणि सिद्रा अमीन यांच्यातील ६९ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. परवेझ ४६ चेंडूत चार चौकारांसह ३३ धावा काढून बाद झाली.

२६ धावांवर पाकिस्तानला तिसरा धक्का

क्रांती गौडने पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. तिने आलिया रियाझला बाद केले, जी फक्त दोन धावा करू शकली. यावेळी पाकची धावसंख्या १२ षटकांनंतर, ३ बाद २६ होती.

मुनीबा अली धावबाद

पाकिस्तानची सलामीवीर मुनीबा अली २ चेंडूत २ धावा काढून धावबाद झाली. क्रांती गौरच्या षटकातील शेवटचा चेंडू तिच्या पॅडवर आदळला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी एलबीडब्ल्यूचे अपील केले. पण पंचांनी तिला नाबाद घोषित केले. त्याचवेळी मुनीब क्रीजमधून बाहेर पडली होती. ही गोष्ट हेरून दीप्ती शर्माने थेट थ्रो केला या जाळ्यात ती सापडली.

248 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी सलामीवी मुनिबा अली आणि सदाफ शम्स यांची भांबेरी उडाली. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. ज्यामुळे पाक संघाला धावा काढणे अवघड झाले. त्यांना 4 षटकांत केवळ 6 धावा काढता आल्या.

महिला विश्वचषक सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर २४८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव ५० षटकांत २४७ धावांवर आटोपला. या सामन्यात भारताची फलंदाजी फारशी चांगली झाली नाही. एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. भारताकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. तिने ६५ चेंडूंच्या डावात चार चौकार आणि एक षटकार मारला.

हरलीन व्यतिरिक्त, जेमिमा रॉड्रिग्जने ३२, प्रतीका रावलने ३१, स्मृती मानधना २३, दीप्ती शर्मा २५, स्नेह राणा २०, कर्णधार हरमनप्रीत कौर १९, क्रांती गौर ८ आणि श्रीचरनी १ धाव केली. रिचा घोषने २० चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह झटपट ३५ धावा केल्या. ती नाबाद राहिली.

पाकिस्तानकडून डायना बेगने चार, तर सादिया इक्बाल आणि कर्णधार फातिमा सना यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. रमीन शमीम आणि नशरा संधू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

डायना बेगने क्रांती गौडला आलिया रियाझ करवी झेलबाद केले. ऑफ-स्टंपच्या दिशेने टाकलेला गुड लेन्थ चेंडू गौडने पुढे सरसावत मिड-ऑफवरून फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटवर नीट न आल्याने ती इनफिल्ड क्लिअर करू शकली नाही. मिड-ऑफवर उभ्या असलेल्या आलिया रियाझने तो सहज झेल पकडला. क्रांतीने २ चौकारांसह ८ धावा केल्या.

सादिया इक्बालने श्री चरणनीला नतालिया परवेझ करवी झेलबाद केले. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात श्री चरणनी तंबूत परतली. चरणनी चेंडूवर पुढे सरसावली तिने उंचावरून फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू तिच्यापासून दूर जात गेला. परिणामी, चेंडू बॅटच्या बाहेरील अर्ध्या भागाला लागून उंच हवेत गेला. बॅकवर्ड पॉइंटला उभी असलेल्या नतालिया परवेझसाठी तो सहज झेल होता. श्री चरणने १ धाव केली.

भारताला सातवा धक्का

दीप्ती शर्माच्या रूपात भारताला सातवा धक्का बसला. ती ३३ चेंडूत २५ धावा करून बाद झाली, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश होता.

भारताची सहावी विकेट

भारताची सहावा विकेट ४५ व्या षटकात पडली. स्नेह राणा ३३ चेंडूत फक्त २० धावा करू शकली.

भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. जेमिमा रॉड्रिग्जच्या रुपात भारताला पाचवा धक्का बसला. तिने ३७ चेंडूत ३२ धावा केल्या, ज्यात पाच चौकारांचा समावेश होता.

सामना पुन्हा सुरू झाला. मैदानात किडे मोठ्या प्रमाणात पसरले होते, ज्यामुळे खेळाडूंना तंबूत माघारी परतावे लागले. मैदानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना दूर करण्यासाठी कीटकांवर फवारणी केल्याने सामना सुमारे १५ मिनिटे थांबवण्यात आला.

मैदानावर किटकांचा धोका

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला विश्वचषक सामना किड्यांमुळे थांबवण्यात आला. मैदान किड्यांनी भरलेले होते, ज्यामुळे खेळाडूंना अडचणी आल्या. सामना थांबवण्याची ही दुसरी वेळ होती. ग्राउंड स्टाफ आता कीटकनाशक फवारणी करत आहेत. भारताने ३४ षटकांनंतर चार विकेट गमावून १५४ धावा केल्या होत्या. जेमिमा रॉड्रिग्ज २८ धावांसह आणि दीप्ती शर्मा दोन धावांवर खेळत होती.

हरलीनचे अर्धशतक हुकले

भारताला चौथा धक्का बसला. हरलीन देओल बाद झाली. तिचे अर्धशतक हुकले. ती चांगली फलंदाजी करत होती पण मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तिने विकेट गमावली. हरलीनने ६५ चेंडूत ४६ धावा केल्या, ज्यामध्ये चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

भारतीय महिला संघाने १५० धावांचा टप्पा गाठला आहे. जेमिमाह आणि हरलीन यांनी संयमी खेळी करून संघाचा डाव सावरला.

२७ व्या षटकात जेमिमा रॉड्रिग्ज थोडक्यात बाद होण्यापासून वाचली. सिद्राने डायना बेगच्या गोलंदाजीवर एक चांगला झेल घेतला. तथापि, तो चेंडू नो-बॉल होता आणि खेळाडूला फ्री हिट देण्यात आला. त्यावर जेमिमाने चौकार मारला.

हरमनप्रीत कौर बाद

डायना बेगने तिच्या नवीन स्पेलच्या पहिल्याच षटकात हरमनप्रीत कौरला बाद केले. यासह भारताला तिसरा मोठा झटका बसला. कौर यष्टिरक्षक सिद्रा नवाजकडे झेलबाद झाली. लेग-साइडच्या दिशेने जाणारा चेंडू सिद्रा नवाजने सफाईदारपणे पकडला. बेगने टाकलेला गुड लेन्थ चेंडू लेग स्टंपच्या दिशेने वेगाने खाली जात होता. हरमनप्रीतने तो चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या आतल्या कडेला लागून मागे गेला. यष्टिरक्षक नवाजने तिच्या डाव्या बाजूला झेप घेत चेंडू टिपला. हरमनप्रीत कौरने ३४ चेंडूत २ चौकारासह १९ धावा केल्या.

भारताच्या १०० धावा पूर्ण

भारतीय संघाने २२ व्या षटकात १०० धावा पूर्ण केल्या. यावेळी संघाने दोन विकेट गमावल्या होत्या. हरमनप्रीत आणि हरलीन देओल या जोडीने संघाचा शतकी आकडा पार केला.

प्रतीका पॅव्हेलियनमध्ये परतली

प्रतिका रावलच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला. प्रतिका चांगली फलंदाजी करत होती, पण सादिया इक्बालने तिला बाद केले. प्रतिका ३७ चेंडूत ३१ धावा करून बाद झाली, तिच्या खेळीमध्ये पाच चौकारांचा समावेश होता.

टीम इंडियाच्या 13 षटकांत 57 धावा

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 13 षटकांत एक गडी गमावून 57 धावा केल्या. यावेळी प्रतिका रावल 27 आणि हरलीन देओल 6 धावांवर खेळत होत्या.

भारताला पहिला धक्का

फातिमा सना हिने स्मृती मानधनाला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. मानधनाने ३२ चेंडूत ४ चौकारांसह २३ धावा काढल्या. प्रतिका रावल आणि मानधनाने पहिल्या विकेटसाठी ४८ धावा जोडल्या.

भारताची जलद सुरुवात

भारताने दमदार सुरुवात केली. प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पाच षटकांत भारताने बिनबाद ३३ धावा केल्या.

भारताचा डाव सुरू

पाकिस्तान विरुद्ध महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारताचा डाव सुरू झाला आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रतिका रावल आणि स्मृती मानधना भारताकडून डावाची सुरुवात करत आहेत.

भारतीय महिला खेळाडूंनीही हस्तांदोलन न करण्याचे धोरण कायम ठेवले

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारतीय महिला खेळाडूंनी हस्तांदोलन न करण्याचे धोरण कायम ठेवले. टॉसदरम्यान हरमनप्रीत कौरने पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिच्याशी हस्तांदोलन केले नाही.

दोन्ही संघांची प्लेईंग 11

भारत : प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, रेणुका सिंह ठाकूर, क्रांती गौर, श्री चरणी.

पाकिस्तान : मुनीबा अली, सदफ शम्स, सिद्रा अमीन, रमीन शमीम, आलिया रियाझ, सिद्रा नवाज (यष्टीरक्षक), फातिमा सना (कर्णधार), नतालिया परवेझ, डायना बेग, नशरा संधू, सादिया इक्बाल.

पाकिस्तानने टॉस जिंकला

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आल्याचे कर्णधार हरमनप्रीत कौरने जाहीर केले. अमनजोत कौर आजारी असल्याने ती सामन्यात खेळू शकणार नाही. तिच्या जागी रेणुका सिंहची निवड करण्यात आली आहे.

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा सहावा साखळी सामना आज, रविवारी (दि. 5) भारतीय महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तानी महिला क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार फातिमा साना हिने टॉस जिंकून भारताविरुद्ध गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तान आणि भारत दोघांनीही प्रत्येकी एक बदल केला. रेणुका ठाकूर हिने भारतीय संघात अमनजोत कौरची जागा घेतली. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेप्रमाणेच, या सामन्यापूर्वीही भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतने पाकिस्तानी कर्णधारांशी हस्तांदोलन केले नाही.

रेणुका सिंहला संधी मिळू शकते

हरमनप्रीत कौरचा संघ या सामन्यात पूर्ण आत्मविश्वासाने उतरेल. भारताची ताकद त्याची फलंदाजी आहे, परंतु मजबूत संघांविरुद्ध फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. बांगलादेश-पाकिस्तान सामन्यात कोलंबोच्या खेळपट्टीने खूप वेग दाखवला, त्यामुळे गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दुखापतीतून परतलेली वेगवान गोलंदाज रेणुका सिंहला भारत मैदानात उतरवू शकतो. तथापि, सराव सत्रादरम्यान ती चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नव्हती. एकाच मैदानावर सर्व सामने खेळण्याचा पाकिस्तानला फायदा होईल, परंतु भारतासारख्या मजबूत संघाविरुद्ध जिंकण्यासाठी चमत्कारिक कामगिरीची आवश्यकता असेल.

वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचे १००% रेकॉर्ड

भारतीय महिला संघ सर्व फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्ध वरचढ आहे, परंतु एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तानने २७ सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने २४ जिंकले आहेत आणि पाकिस्तानने तीन जिंकले आहेत. पाकिस्तानचे तिन्ही विजय टी२० फॉरमॅटमध्ये आले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे १००% रेकॉर्ड आहे, दोन्ही संघांमध्ये खेळलेले सर्व ११ सामने जिंकले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT