क्वीन्सटाऊन ; वृत्तसंस्था : भारतीय महिला क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी न्यूझीलंडविरुद्ध (Women India-New Zealand T20) निर्धारित षटकांच्या मालिकेने करणार आहे. ज्याची सुरुवात बुधवारी एकमात्र टी-20 सामन्याने होईल. एकदिवसीय मालिका 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघांच्या नजरा आगामी विश्वचषक स्पर्धेकडे लक्ष ठेवत विजय मिळवण्याच्या असणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सामने क्वीन्सटाऊनमध्ये आयोजित केले जाणार आहेत. भारतीय संघ क्राईस्टचर्चमध्ये दहा दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण करून येथे पोहोचला आहे. टी-20 सामना न खेळणारी मिताली म्हणाली की, हे वेगळे प्रारूप आहे. संघ विजयाचा पूर्ण प्रयत्न करेल. या खेळपट्टीबाबत आम्हाला माहितीदेखील मिळेल. (Women India-New Zealand T20)
टी-20 कर्णधार हरमनप्रीत कौर महिला बिग बॅश लीगमधील चांगला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. हरमनप्रीत म्हणाली की, आम्हाला परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी दोन किंवा तीन सामने लागतील. आम्ही ही मालिका विश्वचषक तयारीच्या द़ृष्टीने खेळत आहोत. आम्ही सर्वोत्तम कामगिरी करून विजय मिळवण्याचा प्रयत्न करू.
न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईन म्हणाली की, आमचे लक्ष विश्वचषक स्पर्धेपूर्वी योग्य संयोजन तयार करण्याचे असेल. आमचा प्रयत्न विजय मिळवण्याचा असणार आहे. ही मालिका प्रेक्षकांशिवाय खेळविण्यात येणार आहे.
भारतीय संघ यातून निवडणार : (Women India-New Zealand T20)
भारत : हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, एकता बिष्ट, सिमरन बहादूर, एस. मेघना.
मानधना पाचव्या स्थानी; मिताली दुसर्या स्थानी कायम
भारताची सलामी फलंदाज स्मृती मानधना दोन स्थानांच्या फायद्यासह आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचली आहे. तर कर्णधार मिताली राज दुसर्या स्थानी कायम आहे. ताज्या क्रमवारीत मानधनाचे 710 रेटिंग गुण आहेत, तर मितालीचे 738 रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली 742 गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.
बेथ मूनी (719) तिसर्या स्थानी आहेत. गोलंदाजी क्रमवारीत अनुभवी जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामी 727 रेटिंग गुणांसह दुसर्या स्थानी आहे, तर ऑस्ट्रेलियाची जेस जोनासेन (773) हिने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. अष्टपैलू क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी अव्वल स्थानी आहे.