women asia cup semi final india beat bangladesh
टीम इंडियाने महिला आशिया कप 2024 च्या अंतिम फेरीत दमदार एंट्री केली आहे.  Twitter
स्पोर्ट्स

टीम इंडियाची आशिया कपच्या अंतिम फेरीत सलग नवव्यांदा धडक

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Women's Asia Cup : टीम इंडियाने महिला आशिया कप 2024 च्या अंतिम फेरीत दमदार एंट्री केली आहे. शुक्रवारी (दि. 26) झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव केला. बांगलादेशने दाम्बुलाच्या मैदानावर 81 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने एकही विकेट न गमावता 11 षटकांत पूर्ण केले. सलामीवीर स्मृती मानधनाने 39 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. तिने नऊ चौकार आणि एक षटकार मारला. शेफाली वर्माने 28 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने नाबाद 26 धावांची खेळी केली. भारताने सलग नवव्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

भारताने आतापर्यंत स्पर्धेतील जेतेपदाचे सर्व सामने खेळले आहेत. गतविजेता भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने सात वेळा ट्रॉफी जिंकली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची नजर आता आठव्या विजेतेपदावर असेल. अंतिम फेरीत भारताचा सामना कोणाशी होणार हे दुसऱ्या उपांत्य फेरीत यजमान श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीनंतर कळेल.

भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीत बांगलादेशने 20 षटकांत 8 गडी गमावून 80 धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार निगार सुलतानाने सर्वाधिक धावा केल्या. तिने 51 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 32 धावांची खेळी केली. शोर्ना अख्तरने 18 चेंडूत नाबाद 19 धावा केल्या. तिने दोन चौकार मारले. भारताकडून रेणुका ठाकूर सिंग आणि राधा यादव यांनी शानदार गोलंदाजी केली. रेणुकाने तिच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 10 धावा दिल्या आणि तीन विकेट घेतल्या. तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर राधाने 14 धावा देत तीन बळी घेतले. पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात खराब झाली. रेणुकाने पहिल्याच षटकात दिलारा अख्तरला (6) पायचीत केले. यानंतर रेणुजाने तिसऱ्या आणि पाचव्या षटकात बांगलादेशला धक्का दिला.

बांगलादेशने 44 धावांत सहा विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर निगार आणि शोरना यांनी सातव्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली आणि बांगलादेशला 80 धावांपर्यंत नेले. राधाने 20व्या षटकात निगार आणि नाहिदा अख्तरला बाद केले. नाहिदाला खाते उघडता आले नाही. बांगलादेशच्या सात खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही. या यादीत रितू मोनी (5), राबेया खान (1) ते रुमाना अहमद (1), मुर्शिदा खातून (4) आणि इश्मा तंजीम (8) यांचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT