पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटमध्ये 'नर्व्हस नाईन्टीज' (एखादा फलंदाज ९० किंवा त्याहून अधिक धावा करून बाद होतो तो शतक पूर्ण करू शकत नाही. याला क्रिकेटमध्ये 'नर्व्हस नाईन्टीज' म्हणतात.) हा शब्दप्रयोग उच्चारला तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे नाव सर्वप्रथम आपल्या समोर येते. कारण सचिन तेंडुलकर हा आपल्या क्रिकेट कारकीर्दीत तब्बल २७ वेळा 'नर्व्हस नाईन्टीज'चा बळी ठरला होता. याचा अर्थ सचिन हा समीप येवून शतकी खेळीला मुकला होता. अन्यथा आज त्याच्या नावावर असणार्या एकूण शतकी खेळीचा आकडेवारीत लक्षणीय बदल झाला असता. आता असेच काहीसे न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन याच्या बाबत झालं आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात केन विल्यमसन पुन्हा एकदा 'नर्व्हस नाईन्टीज'चा बळी ठरला आहे. (New zealand vs England)
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्च येथे खेळवला जात आहे. या सामन्यात केन विल्यमसन याने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. मात्र ९३ धावांवर ऍटकिन्सनने त्याला जॅक क्रॉलीकरवी झेल बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकाच्या जवळ येऊन बाद होण्याची विल्यमसन याची ही १३ वी वेळ आहे. नर्व्हस 90 चे बळी ठरणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक राहुल द्रविडला पिछाडीवर टाकलं आहे. द्रविड त्याच्या कारकिर्दीत १२ वेळा 'नर्व्हस नाईन्टीज'चा बळी ठरला होता. सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने पहिल्या दिवशी ८ गडी गमावत ३१९ धावा केल्या होत्या. केन विल्यमसन शिवाय आतापर्यंत एकाही फलंदाजाला न्यूझीलंडकडून ५० धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. इंग्लंडकडून शोएब बशीरने सर्वाधिक ४ बळी घेतले. (New zealand vs England)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 90 च्या दशकात सर्वाधिक वेळा 'नर्व्हस नाईन्टीज'चा बळी ठरला. तब्बल २७ वेळा ९० धावा पूर्ण केल्यानंतरही त्याला शतक झळकविण्यात अपयश आलेहोते. सचिनने आपल्या कारकिर्दीत ही 27 शतके पूर्ण केली असती तर त्याच्या नावावर 100 ऐवजी 127 आंतरराष्ट्रीय शतके झाली असती. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 90 धावा केल्यानंतर सर्वाधिक वेळा बाद झालेले फलंदाज : सचिन तेंडुलकर (२७), केन विल्यमसन (१३), राहुल द्रविड (१२), एबी डिव्हिलियर्स (१२), मॅथ्यू हेडन ( 11), रिकी पाँटिंग (11), वीरेंद्र सेहवाग (10), शिखर धवन (10).