नवी दिल्ली : क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत राहणे हे खूप आव्हानात्मक आहे, त्यामुळे आता वाढत्या वयाबरोबरच खेळण्यासाठी सामन्यांची निवड विचारपूर्वक करावी लागेल, असे मत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने व्यक्त केले आहे.
इंग्लंड दौर्यासाठी भारतीय संघाची घोषणा करताना, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सांगितले होते की, बुमराह कदाचित सर्व पाच कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. अर्थात, कोणत्याही व्यक्तीसाठी इतके दिवस सर्व काही खेळत राहणे कठीण आहे. मी हे काही काळ करत आहे. परंतु, शेवटी तुम्हाला तुमचे शरीर कुठे जात आहे, कोणती स्पर्धा महत्त्वाची आहे, हे समजून घ्यावे लागेल, असे बुमराहने सांगितले.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या ‘बियाँड 23’ पॉडकास्टमध्ये बोलताना बुमराह म्हणाला की, तुम्हाला थोडे निवडक आणि थोडे स्मार्ट असणे आवश्यक आहे की, तुम्ही तुमच्या शरीराचा कसा वापर करता. एक क्रिकेटपटू म्हणून मला कधीही काहीही महत्त्वाचे सोडायचे नाही आणि नेहमी पुढे जात राहायचे आहे. या क्षणी मी ठीक आहे. परंतु, इतके सामने खेळायचे आहेत किंवा इथपर्यंत खेळायचे आहे, असे मी टार्गेट ठरवत नाही; पण मी ध्येय ठरवत नाही. कारण, जेव्हा जेव्हा मी ध्येय ठरवली आहेत, तेव्हा मी ती कधीच पूर्ण करू शकलो नाही, असे तो पुढे म्हणाला.
बुमराहने 2028 मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची त्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, मी ऐकले आहे की, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट आहे, त्यामुळे मी त्याची वाट पाहत आहे.
इंग्लंडमध्ये खेळणे नेहमीच एक वेगळे आव्हान असते. मला नेहमीच ड्यूक बॉलने गोलंदाजी करायला आवडते; पण मला माहीत नाही की, ड्यूक बॉल सध्या किती उपयुक्त ठरत आहे. कारण, बॉलमध्ये नेहमीच सतत बदल होत असतात.
हवामान, स्विंगिंगची परिस्थिती, जेव्हा बॉल सॉफ्ट होतो तेव्हा नेहमीच एक आव्हान असते. त्यामुळे मी नेहमीच इंग्लंडमध्ये खेळण्यास उत्सुक असतो.
इंग्लंडची ‘बॅझबॉल’ क्रिकेट शैली भारतीय गोलंदाजांना कसोटी मालिकेत चांगली संधी देईल. ती क्रिकेटची एक मनोरंजक शैली खेळत आहेत; पण मला ती जास्त समजत नाही.
एक गोलंदाजी युनिट म्हणून आम्हाला नेहमीच आत्मविश्वास असतो की, जेव्हा फलंदाज अतिआक्रमक असतात, तेव्हा कोणीही विकेटस् मिळवू शकतो. मोहम्मद सिराजचा संघात समावेश खूप फायदेशीर ठरेल.
ऑस्ट्रेलियात आम्हाला मोहम्मद शमीची उणीव भासली आणि सिराज आत्मविश्वास मिळवत होता. त्यामुळे तो तिथे असताना नेहमीच चांगले असते. तो खूप कुशल आहे. तो नेहमीच खूप योगदान देतो.
प्रतिस्पर्धी फलंदाजांना स्लेजिंग करण्याऐवजी कामगिरीद्वारे माझी आक्रमकता व्यक्त करतो. माझी स्पर्धात्मक भावना आहे आणि मी जिंकण्यासाठी खेळतो; पण मला मर्यादा ओलांडायच्या नाहीत. तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहे; पण तुम्हाला विदूषक व्हायचे नाही. मी फक्त वेगाने गोलंदाजी करण्याकडे लक्ष देत आहे.