मुंबई; वृत्तसंस्था : फुटबॉलचा जादूगार लियोनेल मेस्सी आता क्रिकेटच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. येत्या 14 डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार असल्याची माहिती आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार एम. एस. धोनी आणि विराट कोहलीही खेळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वानखेडेवर मेस्सी विरुद्ध एम. एस. धोनी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सामन्यात सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्यासाखे दिग्गजही खेळताना दिसणार आहेत. मुंबईतील प्रसिद्ध एजन्सीने 14 डिसेंबरसाठी वानखेडे स्टेडियम राखीव ठेवावे, असा अर्ज ‘एमसीए’कडे केल्याची माहिती आहे.
मेस्सी लवकरच भारताच्या दौर्यावर येणार आहे. मेस्सीचा हा भारत दौरा 13 ते 15 डिसेंबरदरम्यान होणार असून, तो मुंबईसह नवी दिल्ली आणि कोलकाता येथेही भेट देणार आहे. 2011 मध्ये कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर व्हेनेझुएलाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळल्यानंतर तब्बल 14 वर्षांनी मेस्सी भारतात येणार आहे.
सध्या 38 वर्षीय मेस्सी मेजर लीग सॉकर क्लब इंटर मियामीसाठी खेळतो आहे. 2022 मध्ये अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर तो आता 2026 मध्ये अमेरिकेत होणार्या फिफा विश्वचषकात खेळण्याची तयारी करतो आहे. हा विश्वचषक त्याचा शेवटचा विश्वचषक ठरणार आहे. सामन्याच्या आयोजनासाठी तयारी पूर्ण झाली आहे. ही तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सामन्याचे वेळापत्रक आणि स्वरूप जारी केले जाईल, अशी माहिती ‘एमसीए’च्या सूत्रांनी दिली आहे.