पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) चालू हंगामातील अत्यंत खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स (MI) आपल्या संघात मोठे बदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सलग तीन वर्ष मुंबई इंडियन्सचा कर्णधार राहिलेल्या हार्दिक पांड्याला आपल्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागणार असल्याचीही माहिती (एक्सप्रेस स्पोर्ट्स ) च्या माध्यमातून समोर आली आहे.
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला १४ पैकी १० सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने संघ गुणतालिकेत थेट नवव्या स्थानावर गेला आहे. गेल्या सहा वर्षांपासून मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवता आलेले नाही, त्यामुळे संघ व्यवस्थापनामध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. यामुळे संघात मोठे फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू असून कर्णधारपदाची धुरा एका अनुभवी खेळाडूकडे सोपवली जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
'गुजरात टायटन्स' संघातील उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेऊन मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने त्याला आपल्या संघात घेऊन त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. हार्दिक पांड्याने २०२४ च्या हंगामापासून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली. त्याआधी रोहित शर्मा हा संघाचा कर्णधार होता. मात्र, सलग काही सामन्यांतील पराभवांमुळे व गुणतालिकेत संघ नवव्या स्थानावर गेल्याने व्यवस्थापनाकडून नाराजीचा सूर येत आहे. त्यामुळे आगामी काळात 'मुंबई इंडियन्स' हार्दिक पांड्याबाबत काय निर्णय घेणार? त्याला त्याचे कर्णधारपद गमवावे लागणार का? याकडे किक्रेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.