स्पोर्ट्स

Mulder Triple Century : 400 धावांचा विक्रम तोंडाशी.. 367 वर तंबूत नाबाद परतला! मुल्डरच्या निर्णयाने क्रिकेटविश्व चकित

ब्रायन लाराचा 21 वर्षे जुना विक्रम अबाधित, मुल्डरने 334 चेंडूंमध्ये 49 चौकार आणि 4 षटकारांच्या साहाय्याने नाबाद 367 धावांची खेळी साकारली.

रणजित गायकवाड

wiaan mulder world record smashed triple hundred

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने झिम्बाब्वेविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकण्याच्या दिशेने कूच केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दिमाखदार विजय नोंदवल्यानंतर, दुसऱ्या कसोटीतही संघाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. याचदरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वियान मुल्डर याने घेतलेल्या एका अनपेक्षित निर्णयाने क्रिकेटविश्वात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याच्या या निर्णयामुळे ब्रायन लाराचा 21 वर्षे जुना विश्वविक्रम अबाधित राहिला. मुल्डर दुसऱ्या कसोटी सामन्यात 400 धावांच्या ऐतिहासिक टप्प्यापासून काही धावा दूर होता, मात्र त्याचवेळी त्याने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तो विश्वविक्रम रचण्यापासून वंचित राहिला.

एका निर्णयाने सर्वांनाच केले चकित

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आपला पहिला डाव 5 गडी बाद 626 धावांवर घोषित केला. या वेळी कर्णधार वियान मुल्डर 367 धावांवर नाबाद राहिला. मुल्डर ज्या प्रकारे फलंदाजी करत होता, त्यावरून तो ब्रायन लाराचा कसोटी क्रिकेटमधील नाबाद 400 धावांचा विश्वविक्रम सहज मोडीत काढेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. तथापि, उपहारादरम्यानच (लंच ब्रेक) मुल्डरने एक अनपेक्षित निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव घोषित केला.

वियान मुल्डरने 334 चेंडूंमध्ये 49 चौकार आणि 4 षटकारांच्या साहाय्याने नाबाद 367 धावांची खेळी साकारली. यापूर्वी, ब्रायन लाराने 2004 साली इंग्लंडविरुद्ध नाबाद 400 धावांची विक्रमी खेळी केली होती. त्यांचा हा विक्रम आजतागायत अबाधित आहे. विशेष म्हणजे, मुल्डरने या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातही शानदार शतकी खेळी केली होती.

वियान मुल्डरने 334 चेंडूंमध्ये 49 चौकार आणि 4 षटकारांच्या साहाय्याने नाबाद 367 धावांची खेळी साकारली. यापूर्वी, ब्रायन लाराने 2004 साली इंग्लंडविरुद्ध नाबाद 400 धावांची विक्रमी खेळी केली होती. त्यांचा हा विक्रम आजतागायत अबाधित आहे. विशेष म्हणजे, मुल्डरने या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातही शानदार शतकी खेळी केली होती.

पहिल्या कसोटीतही झळकावले होते शतक

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वियान मुल्डरने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 147 धावांची खेळी केली होती. याव्यतिरिक्त, त्याने गोलंदाजीत चार बळीदेखील मिळवले होते. तथापि, त्या सामन्यात संघाचे नेतृत्व केशव महाराजकडे होते. वियान मुल्डरने आतापर्यंत 21 कसोटी सामने खेळले असून, यामध्ये त्याने 38.43 च्या सरासरीने 1153 धावा केल्या आहेत. यात तीन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. याचबरोबर, त्याने 35 बळीदेखील पटकावले आहेत.

या फलंदाजांची अर्धशतकी खेळी

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मुल्डरव्यतिरिक्त डेव्हिड बेडिंगहॅमने 82 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याचबरोबर, लुआन-ड्री प्रिटोरियसने 78 धावा केल्या. यष्टीरक्षक-फलंदाज काइल व्हायने याने नाबाद 42 धावांची खेळी केली. या फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावरच दक्षिण आफ्रिकेने आपला पहिला डाव 5 गडी बाद 626 धावांवर घोषित केला.

मुल्डरचे हे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान त्रिशतक ठरले आहे. याबाबतीत त्याच्या पुढे केवळ भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आहे. सेहवागने 2008 मध्ये चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच 278 चेंडूंत 300 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती.

एकाच डावात अनेक विक्रमांना गवसणी

मुल्डरने आपल्या या ऐतिहासिक खेळीत अनेक विक्रम मोडीत काढले. यात न्यूझीलंडच्या ग्रॅहम डाउलिंग याला मागे टाकले. किवी फलंदाजाने 1968 मध्ये भारताविरुद्ध कर्णधार म्हणून पदार्पणात 239 धावा केल्या होत्या. तसेच द. आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ यांचाही विक्रम मोडीत काढला. स्मिथने 2003 मध्ये इंग्लंडविरुद्ध 277 धावा केल्या होत्या. आता मुल्डर दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यासोबतच, मुल्डर इंग्लंडच्या हॅरी ब्रूक पुढे झेप घेतली आहे. ब्रूकने गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध इंग्लिश संघाचे नेतृत्व करत 310 चेंडूंत त्रिशतक झळकावले होते.

हा मुल्डरचा केवळ 21 वा कसोटी सामना होता. तो हाशिम अमलानंतर दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. मुल्डरची ही खेळी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवली गेली आहे.

कर्णधार म्हणून पदार्पणात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • 367 : वियान मुल्डर विरुद्ध झिम्बाब्वे, 2025

  • 256 : विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2014

  • 244 : ग्रॅहम डाउलिंग विरुद्ध भारत, 1968

  • 232 : ग्रेग चॅपेल विरुद्ध वेस्ट इंडिज, 1975

  • 212 : ॲलिस्टर कुक विरुद्ध बांगलादेश, 2010

कसोटी इतिहासात एका दिवसात सर्वाधिक धावा

  • 309 : डॉन ब्रॅडमन विरुद्ध इंग्लंड, 1930

  • 295 : वॉली हॅमंड विरुद्ध न्यूझीलंड, 1933

  • 284 : वीरेंद्र सेहवाग विरुद्ध श्रीलंका, 2009

  • 273 : डेनिस कॉम्प्टन विरुद्ध पाकिस्तान, 1954

  • 271 : डॉन ब्रॅडमन विरुद्ध इंग्लंड, 1934

  • 264 : वियान मुल्डर विरुद्ध झिम्बाब्वे, 2025

  • 257 : वीरेंद्र सेहवाग विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2008

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT