स्पोर्ट्स

Shai Hope Century : शे होपचा शतकी तडाखा, पाकिस्तानला धुतलं! डीव्हिलियर्सला टाकले मागे

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शे होप याने केवळ ९४ चेंडूंचा सामना करताना नाबाद १२० धावांची खेळी केली.

रणजित गायकवाड

पाकिस्तानविरुद्धच्या निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होप याने केलेल्या वादळी शतकाने एकाच वेळी अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. आपल्या या खेळीने होप याने केवळ संघाचा विजय निश्चित केला नाही, तर यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून एबी डीव्हिलियर्सला मागे टाकले आहे. इतकेच नव्हे, तर आता ख्रिस गेल आणि महेंद्रसिंग धोनी यांचे मोठे विक्रमही होपच्या निशाण्यावर आले आहेत.

होपच्या शतकी खेळीने वेस्ट इंडिजची मजबूत धावसंख्या

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शे होप याने केवळ ९४ चेंडूंचा सामना करताना नाबाद १२० धावांची खेळी केली. १२७.६५ च्या प्रभावी स्ट्राइक रेटने केलेल्या या खेळीत १० चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. हे शे होपच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १८ वे, तर पाकिस्तानविरुद्धचे दुसरे शतक ठरले. होपच्या या शतकाच्या बळावर वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २९४ धावांचा डोंगर उभारला, जो पार करणे पाकिस्तानसाठी एक मोठे आव्हान ठरले.

डीव्हिलियर्सला मागे टाकले

सामनावीराचा पुरस्कार मिळवून देणाऱ्या होपच्या या शतकामुळे त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. या शतकासह त्याने यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक एकदिवसीय शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत द. आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डीव्हिलियर्सला मागे टाकले आहे. यष्टीरक्षक म्हणून शे होपच्या नावावर आता ५ एकदिवसीय शतके जमा झाली आहेत, तर डीव्हिलियर्सच्या नावावर ४ शतके आहेत.

या बाबतीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर विश्वविक्रम आहे, ज्याने यष्टीरक्षक म्हणून ६ शतके झळकावली आहेत. त्यामुळे, धोनीचा विक्रम मोडण्यापासून होप केवळ दोन शतके दूर आहे. आगामी काळात आणखी दोन शतके झळकावून तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा यष्टीरक्षक बनू शकतो.

ख्रिस गेलचा विक्रमही धोक्यात!

पाकविरुद्धच्या शतकासह शे होप आता वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक शतके करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. त्याने केवळ १३७ डावांमध्ये १८ शतके पूर्ण केली आहेत. यासह त्याने डेसमंड हेन्स (१७ शतके, २३७ डाव) यांना मागे टाकले आहे.

आता होपच्या पुढे केवळ ब्रायन लारा आणि ख्रिस गेल आहेत. वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलच्या (२५ शतके, २९१ डाव) नावावर आहे. त्यानंतर ब्रायन लारा (१९ शतके, २८५ डाव) दुसऱ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे, ज्या वेगाने होप शतके झळकावत आहे, ते पाहता तो गेल आणि लारा या दोघांनाही त्यांच्यापेक्षा कमी डावांमध्ये मागे टाकू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT