Shubman Gill T20 World Cup Pudhari
स्पोर्ट्स

Shubman Gill: शुभमन गिलसोबत विश्वासघात? वर्ल्ड कप संघातून वगळल्यानंतर धक्कादायक खुलासा; पडद्यामागची ‘इनसाइड स्टोरी’

Shubman Gill World Cup 2026: टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर शुभमन गिलचं नाव नसल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गिलला संघातून वगळण्यात येत असल्याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती.

Rahul Shelke

Shubman Gill Dropped from T20 World Cup: टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. कारण या संघात भारताचा स्टार फलंदाज आणि सध्याचा कसोटी व वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल याचं नावच नाही. आता हे स्पष्ट झालं आहे की शुभमन गिल पुढील वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही.

मात्र, या निर्णयापेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे गिलला टी20 संघातून वगळण्यात येत असल्याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. एनडीटीव्हीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने ही माहिती दिली आहे.

या सूत्रानुसार, चीफ सेलेक्टर अजित आगरकर, हेड कोच गौतम गंभीर आणि संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यापैकी कुणीही शुभमन गिलशी थेट संवाद साधला नव्हता. म्हणजेच, कोणतीही अधिकृत चर्चा न करता गिलला थेट संघाबाहेर ठेवण्यात आलं, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

दुसरीकडे, सूर्यकुमार यादव सध्या खराब फॉर्ममध्ये असतानाही त्याचं कर्णधारपद किमान वर्ल्ड कपपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे निवड प्रक्रियेतील निकषांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान शुभमन गिलच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतरच टीम मॅनेजमेंट गिलच्या पुढील पर्यायांचा विचार करू लागल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या काळातच गौतम गंभीर, सूर्यकुमार यादव आणि टीम मॅनेजमेंट गिलऐवजी इतर खेळाडूंवर लक्ष केंद्रित करू लागले होते.

महत्त्वाची बाब म्हणजे अहमदाबादमध्ये झालेल्या पाचव्या टी20 सामन्यात खेळण्याची गिलची इच्छा होती. वैद्यकीय तपासणीत त्याची दुखापत गंभीर नसल्याचंही स्पष्ट झालं होतं. म्हणजेच, तो सामना खेळण्यासाठी फिट होता. तरीसुद्धा, त्या सामन्याआधीच त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

यामुळे शुभमन गिलला कोणतीही माहिती न देता संघाबाहेर काढण्यात आल्याचं चित्र समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेतही अजित अगरकर यांनी गिलला ड्रॉप करण्याबाबत स्पष्ट उत्तर देणं टाळल्याचं दिसून आलं.

भारताचा भविष्यातील मोठा स्टार मानल्या जाणाऱ्या खेळाडूसोबत अशी चर्चा न करता निर्णय घेणं, ही निवड प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी बाब असल्याचं क्रिकेट वर्तुळात बोललं जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर BCCI आणि टीम मॅनेजमेंट नेमकी काय भूमिका घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT