स्पोर्ट्स

विंबल्डनमधील पांढऱ्या कपड्यांपासून ते स्ट्रॉबेरीपर्यंतची रंजक कथा आपणास माहीत आहे का?

Pudhari News

पुढारी ऑनलाईन डेस्क : विंबल्डन म्हणजे टेनिसमधील ग्रँडस्लॅमचा राजच. चार ग्रँडस्लॅम स्पर्धेत वेगळेपण जपणारी स्पर्धा म्हणजे विंबल्डन. याच विंबल्डनच्या काही हटके प्रथा आहेत ज्या विंबल्डनला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन जातात. इतर ग्रँडस्लॅममध्ये खेळाडू रंगिबेरंगी कपडे घालून खेळत असतात. पण, विंबल्डन म्हटले की नखशिखांत पांढरेपण. हिरव्यागार ग्रास कोर्टवर ते पांढरे कपडे घालून खेळणारे टेनिसपटू पाहताना एक वेगळीच अनुभूती होते. 

पण, विंबल्डनची ओळख फक्त पांढरी कपडे इतकीच नाही. विंबल्डनमध्ये अनेक प्रथा आहेत. आज आपण त्यातील काही प्रथांबाबत त्या कशा सुरु झाल्या हे जाणून घेणार आहोत. 

पांढरे कापडेच का घालायचे? 

आता खेळ आणि खेळाडू म्हणजे घाम हा आलाच की, पण ब्रिटनमध्ये व्हिक्टोरियन काळात घाम येणे हे चांगले लक्षण मानले जायचे नाही. त्यामुळेच टेनिसमध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे वापरण्यास सुरुवात झाली. यामुळे लोकांना घाम लपवण्याचा जास्तीजास्त प्रयत्न करता येऊ लागला. 

तेव्हापासून हा नियम आजतागायत ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबला चिकटला. आजही हा नियम काटेकोरपणे पाळला जातो. अनेकवेळा खेळाडूंनी हा नियम मोडल्यामुळे त्यांना कोर्ट सोडून आत पळावे लागले होते. २०१३ ला स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याला त्याने नारंगी रंगाचा सोल असलेला शूज घातल्याने कोर्ट सोडून आत जावे लागले होते. त्याला तो शूज बदलावा लागला होता. 

स्ट्रॉबेरी आणि क्रीम 

स्ट्रॉबेरी आणि विंबल्डन हे गणित पहिल्या स्पर्धेपासून म्हणजे १८७७ पासून पहायला मिळते. आजही लोक विंबल्डन म्हटले की स्टॉबेरी आणि क्रीमची आठवण काढतातच. 

काहींच्या मते स्ट्रॉबेरी क्रीमचे आणि खेळाचे नाते किंग हेन्री आठवा यांच्या काळापासून सुरु झाले आहे. राजाचा एक सल्लागार थॉमस वॉलसीने सांगितल्याप्रमाणे हे स्नॅक्स सन १५०० च्या सुरुवातीपासून कार्यक्रमात दिले जात होते. हीच स्ट्रॉबेरी क्रीम देण्याची परंपरा विंबल्डनमध्येही उतरली. विंबल्डनमध्येही हॅम्पन कोर्ट परिसरात प्रेक्षकांच्या हातात स्ट्रॉबेरी आणि क्रीम नित्य नियमाने दिसते.  

मरे माऊंड की हेनमॅन हील? 

विंबल्डनमध्ये ऐतिहासिक कोर्ट वन परिसराच्या नावावरुन एक वाद आहे. या कोर्ट वन परिसराला हेनमम हील म्हणायचे की मरे माऊंड म्हणायचे याच्यावरून तो वाद आहे. पण, तुम्हाला आश्चर्य होईल की याचे अधिकृत नाव हे ओरॅन्गी टेरेस आहे. कारण ही जमीन ऑल इंग्लंड क्लबने न्यूझीलंड स्पोर्ट अँड सोशल क्लबला १९६७ ते १९८१ पर्यंत भाड्याने दिली होती. त्यांना याला ओरॅन्गी नाव दिले. याचा अर्थ हा आकाशातील ढग असा होतो. न्यूझीलंडच्या माऊंट कूकचे न्यूझीलंडचे मूळ निवासी मोओरीमधील नाव म्हणजे ओरॅन्गी.

टीम हेनमन हा ९० च्या दशकात सर्वोत्तम कामगिरी करत होता. लोक त्याचे सामने मोठ्या टीव्ही स्क्रीनवर पाहण्यासाठी जमा होत असत. तेव्हापासून या टेकडाला हेलमन हील असे नाव पडलेय. पण, आता ब्रिटीश टेनिस स्टार अँडी मरेने २०१२ च्या ऑलिम्पिक आणि विंबल्डनमध्ये २०१३ आणि २०१६ ला दमदार कामगिरी करत विजय मिळवल्यानंतर काही लोकांनी या टेकडीला मरे माऊंड म्हणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या टेकडीच्या नावावरुन वादाची उत्पत्ती झाली आहे.

रांगेचीही आहे परंपरा

आपणाला रांग म्हटलं की अनेक ठिकाणे आठवतात. यात रेशनिंग दुकान, सरकारी बँक, सध्या लसीकरणाची रांग यांचा समावेश आहे. भारतात रांग हा शब्द आणि कृती इतकी सामान्य आहे की त्याचे कोणालाच काही विशेष वाटत नाही. पण, विंबल्डनमध्ये रांगेलाही परंपरा मानतात. 

विंबल्डनमध्ये ही रांगेची परंपरा आहे. त्याला एक राष्ट्रीयत्वाची किनार आहे. वर्षानुवर्षे ही परंपरा दृढ होत चालली आहे. साधारणपणे १९२७ मध्ये विंबल्डन पाहण्यासाठी आलेल्या जवळपास २ हजार लोकांना मैदान पूर्ण भरल्याने माघारी फिरावे लागले होते. पण, हे सगळे स्वयमशिस्तीत झाले होते. रांग ( queue ) हा शब्द ब्रिटीश वाटत पण, हा शब्द कदाचित लॅटिन भाषेतील कौदा ( 'cauda') पासून आला असावा. कौदाचा अर्थ शेपूट असा होतो.

स्वयंम शिस्तीतील रांग राष्ट्रीय गोष्ट कधी झाले हे सांगणे कठीण आहे. पण, हा गोष्ट १९ व्या शतकात सुरु झाली असावी. त्यावेळी ब्रिटनमध्ये औद्योगीकरणाला सुरुवात झाली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी जमा होत असत. तेव्हाच नैसर्गिकरित्या रांग तयार झाली असावी. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धात या रांगेच्या परंपरेला एक ठोस स्वरुप मिळाले असावे. हे  देशाप्रती असलेल्या तुमच्या कर्तव्याचे प्रतिक बनले असावे. कठिण काळात सभ्य आणि नागरिकरणाचे ते प्रतिक होते. आता शिस्तबद्ध रांग ही विंबल्डनची एक प्रथाच बनली आहे.

पिम्स पाचक द्रव्य

जेम्स पिम याला या कॉकटेलचे श्रेय जाते. त्याने १८४० मध्ये पचनासाठी उपयुक्त मानले जाणारे हे पेय तयार केले. थोड्याच कालावधतीत त्याला भरघोस व्यावसायिक यश मिळाले. त्यानंतर पिम यांनी हे पेय संपूर्ण युकेमध्ये आणि जगभरात विकण्यास सुरुवात केली. 

या पेयाची लोकप्रियता विंबल्डनमध्येही भरपूर आहे. विंबल्डनमध्ये पहिला पिम बार १९७१ मध्ये सुरु झाला. आता हे पेय प्रेक्षकांच्या गॅलरीत अनेकांच्या हातात दिसते.

SCROLL FOR NEXT