ICC T-20 World Cup | संजू सॅमसन की इशान; अभिषेकचा जोडीदार कोण? File Photo
स्पोर्ट्स

ICC T-20 World Cup | संजू सॅमसन की इशान; अभिषेकचा जोडीदार कोण?

टीम इंडियाच्या ‘ओपनिंग’साठी जोरदार रस्सीखेच

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा आता केवळ पाच-सहा आठवड्यांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून सर्वच संघांची यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या स्पर्धेपूर्वी भारताचा संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका देखील खेळणार आहे. मात्र, आश्चर्य म्हणजे भारतीय संघात अभिषेक शर्माचा सहकारी सलामीवीर संजू सॅमसन असेल की इशान किशन, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

सलामीसाठी तीन शिलेदार मैदानात

भारतीय संघाने वर्ल्ड कपच्या तयारीला वेग दिला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सलामीच्या जागेसाठी सध्या संघात तीन प्रबळ दावेदार आहेत. यात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन यांचा समावेश आहे. या तिघांपैकी अभिषेक शर्माची जागा जवळपास पक्की मानली जात आहे, पण त्याचा जोडीदार कोण असेल? हा खरा पेच निवड समितीसमोर आहे.

संजू-अभिषेक जोडीला प्राधान्य का?

मिळालेल्या माहितीनुसार, संघ व्यवस्थापन सध्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीलाच सलामीसाठी पसंती देऊ शकते. याचं मुख्य कारण म्हणजे या दोघांनी गेल्या काही मालिकांमध्ये सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. ईशान किशनला संधी मिळण्यासाठी संजू किंवा अभिषेक यांच्यापैकी कोणा एकाचा फॉर्म खराब होणे किंवा दुखापत होणे, अशीच परिस्थिती निर्माण व्हावी लागेल. तोपर्यंत इशानला बाकावरच बसावे लागण्याची शक्यता अधिक आहे.

अभिषेकनंतर संजू सॅमसनच घातक!

अभिषेक शर्माचा 188 चा स्ट्राईक रेट त्याला टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वात घातक ठरवतो, तर संजू सॅमसनने सर्वाधिक 3 शतके झळकावली आहेत. इशान किशनच्या खात्यात 6 अर्धशतके असली तरी स्ट्राईक रेट आणि शतकांच्या बाबतीत तो सध्या मागे दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका 2026 च्या वर्ल्ड कपची ड्रेस रिहर्सल मानली जात आहे.

इशान किशनचे ‘धडाकेबाज’ पुनरागमन, पण...

बर्‍याच काळानंतर इशान किशनने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये त्याने झंझावाती शतक ठोकून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले, पण फॉर्ममध्ये असूनही, न्यूझीलंडविरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला लगेच संधी मिळण्याची शक्यता कमी वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT