मुंबई : सर्वांना आश्चर्यचकित करत आयपीएल 2025 च्या मध्यभागी रोहित शर्माने एक मोठा निर्णय घेतला आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून याबद्दल अंदाज बांधले जात होते, पण रोहित अद्याप कसोटीतून निवृत्त होण्याच्या मनःस्थितीत नाही आणि तो इंग्लंड दौऱ्यावर जाईल, असे सांगितले गेले. पण रोहितने त्याचा निर्णय जाहीर केला. आता प्रश्न असा आहे की रोहितच्या रिकाम्या झालेल्या नेतृत्वाच्या जागी कोणत्या खेळाडूची वर्णी लागणार?
बीसीसीआयचे निवडकर्ता अजित आगरकर यांना इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्माला कर्णधार बनवणे योग्य वाटले नाही आणि त्यांनी हा अहवाल बोर्डाला सादर केला. यानंतर रोहित शर्माला संघातून वगळले जाईल आणि त्याचे कर्णधारपद काढून घेतले जाईल हे निश्चित दिसत होते. आता मोठा प्रश्न असा आहे की रोहितच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदी कोण विराजमान होईल? विराट कोहली पूर्वीच या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मग या पदासाठी दावेदार कोण असेल? याची जोरादार चर्चा सुरू झाली आहे.
बुमराह हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे आणि तो कर्णधारपदाचा मुख्य दावेदार आहे. पण त्याचा फिटनेस ही मोठी समस्या आहे. इंग्लंड दौ-यावर तो पाचही कसोटी सामने खेळू शकेल की नाही याबाबत अनिश्चितता आहे. पण अनुभवाच्या जोरावर त्याला नवीन कर्णधार बनवून इंग्लंडला पाठवले जाऊ शकते.
बुमराहने आतापर्यंत 45 कसोटी सामने खेळले आहेत ज्यात त्याने 205 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने कसोटी क्रिकेटमध्येही कर्णधारपद भूषवले आहे. एवढेच नाही तर त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाच्या उपकर्णधाराची भूमिकाही बजावली आहे. अशा परिस्थितीत त्याला पुन्हा एकदा संधी मिळू शकते.
एकदिवसीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिल रोहितची जागा घेण्यासाठी दावेदार आहे. गिलला मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा पाठिंबा आहे. तसेच, भविष्याकडे पाहता, गिल हा एक योग्य पर्याय आहे. तो आयपीएलमध्ये गुजरातचे नेतृत्व करत आहे आणि त्याने खूप प्रभावी कामगिरी केली आहे. गिल हा लंबी रेस का घोडा आहे. जर तो नेतृत्व करण्यात तयशस्वी झाला तर भारताला दीर्घकालीन कर्णधार मिळेल. गिलने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत 32 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 5 शतके आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटमधील त्याची सरासरी 35.06 आहे.
या शर्यतीत ऋषभ पंत हे आणखी एक नाव आहे. जेव्हा विराट कोहलीने संघाचे कर्णधारपद सोडले तेव्हा पंतचे नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत होते, परंतु रोहितने त्याला मागे टाकले. पंत हा कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे आणि तो संघातील सर्व खेळाडूंना चांगले ओळखतो. पंतने आतापर्यंत 43 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण 4005 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 42.11 आहे. सध्या तो आयपीएलमध्ये लखनौचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी त्याने रणजीमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले आहे आणि टी-20 मध्येही भारताचे नेतृत्व केले आहे.