पुढारी ऑनलाईन डेस्क
आयपीएलचा १४ वा हंगाम येत्या ९ एप्रिलपासून सुरु होत आहे. या हंगामात आपण अनेक सामन्यांवर अनेक खेळाडूंवर नजर ठेवून असणार आहे. कारण हे संघ खेळाडू कोणत्या क्षणी काय करतील, याचा काही नेम नाही. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात असे अनेक रेकॉर्ड पाहिले आहेत जे क्षणात बनले आणि क्षणात मोडले गेलेही. असेच एक रेकॉर्ड आहे ते म्हणजे आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाचे. सर्वात वेगवान अर्धशतकाचा आयपीएल प्रवास हा २०१८ मध्ये १४ चेंडूंवर येऊन ठेपला आहे.
१४ चेंडू
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम सध्या तरी पंजाब किंग्जचा केएल राहुल याच्या नावावर आहे. त्याने २०१८ च्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध फक्त १४ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्याने या डावात १६ चेंडूत ५१ धावा केल्या होत्या. त्यात त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. या धडाकेबाज सुरुवातीनंतर पंजाबने १८.५ षटकात १६७ धावांचे आव्हान पार केले.
१५ चेंडू
सर्वात वेगवान अर्धशतकातच्या यादीत दुसऱ्या स्थानावर युसूफ पठाण आणि सुनिल नारायण यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. युसूफ पठाणने २०१४ मध्ये १५ चेंडूत अर्धशतक ठोकले होते तर २०१७ मध्ये सुनील नारायणने १५ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. तसं बघायला गेलं तर दुसऱ्या स्थानावर या दोघांचीही दावेदारी आहे.
पण, युसूफ पठाणने या आपल्या वेगवान अर्धशतकाचे रुपांतर मोठ्या खेळीत केले. त्याने हैदराबादविरुद्ध २२ चेंडूत ७२ धावा ठोकल्या. दुसऱ्या बाजूला नारायणला आपल्या अर्धशतकाचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश आले. त्याची आरसीबी विरुद्धची ही आक्रमक अर्धशतकी खेळी १७ चेंडूत ५४ धावात आटोपली. त्यामुळे पठाणच्या या अर्धशतकाचे महत्व किंचित जास्त आहे.
१६ चेंडू
चेन्नई सुपर किंग्जचा स्टार डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने २०१४ च्या आयपीएल हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध ८७ धावांची खेळी केली होती. हा सामना सीएसकेला फायनलमध्ये पोहचण्यासाठी जिंकणे गरजेचे होते. पंजाबने सीएसके समोर २२७ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना सीएसकेने पॉवर प्लेमध्येच १०० धावा ठोकल्या होत्या. त्यात एकट्या रैनाचा वाटा ८७ धावांचा होता. पण, तो सातव्या षटकात बाद झाला आणि सीएसकेला २०२ धावांपर्यंतच मजल मारता आली. ही ८७ धावांची खेळी करताना रैनाने १६ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. हे त्याने अर्धशतक आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचे तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे.
१७ चेंडू
आयपीएलमध्ये षटकारांचा बादशाह म्हणून निर्विवाद वर्चस्व गाजवणारा फलंदाज म्हणजे ख्रिस गेल. या गेलने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध नाबाद १७५ धावांची तडाखेबाज खेळी केली होती. ही आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी आहे. ही खेळी करतानाच गेलने १७ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. हे त्याचे अर्धशतक आयपीएल इतिहासातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान अर्धशतक म्हणून गणले जाते. या वेगवान अर्धशतकाच्या यादीत हार्दिक पांड्या, इशान किशन, कायरन पोलार्ड, ॲडम गिलख्रिस्ट, निकोलस पूरन, ख्रिस मॉरिस आणि सुनील नारायण यांच्याही नावाचा समावेश आहे.