पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) चा तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात खेळला गेला. या सर्वात कट्टर प्रतिस्पर्ध्यात मुंबईला ४ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला असला तरी, एमआयचा डावखुरा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने त्याच्या पहिल्याच पदार्पणाच्या सामन्यात तीन मोठ्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तथापि, विघ्नेशचा प्लेइंग-११ मध्ये समावेश नव्हता. त्याचा 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून संघात समावेश केले. या पार्श्वभूमीवर, विघ्नेश पुथूर कोण आहे ते जाणून घेऊया?
विघ्नेश पुथूरचा प्रभावशाली खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला. पहिल्याच षटकात त्याने उत्कृष्ट फंलदाजी करणाऱ्या सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला बाद केले आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विघ्नेशने ऑफ स्टंपच्या बाहेर गायकवाडला एक चेंडू टाकला, जो थेट विल जॅक्सच्या हातात गेला. याशिवाय, त्याने दुसऱ्याच षटकात हिटर फलंदाज शिवम दुबेला बाद केले. त्याने दुबेला तिलक वर्माने लांब उभे राहून झेलबाद केले. शेवटी त्याने दीपक हुड्डाला त्याच्या जाळ्यात अडकवले. हुड्डाला फक्त ३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवण्यात आले. यादरम्यान, विघ्नेशने ४ षटकांत ३२ धावा देत ३ बळी घेतले.
२४ वर्षीय विघ्नेश पुथूर हा केरळमधील मलप्पुरमचा रहिवासी आहे. त्याने आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करून बरीच प्रसिद्धी मिळवली. पुथूरने वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचे वडील सुनील कुमार ऑटो चालक आहेत तर आई के. पी. बिंदू ह्या गृहिणी आहे. त्याची गोलंदाजीची कृती थोडी अपारंपरिक आहे, ज्यामुळे त्याला क्रिकेटच्या क्रमवारीत वाढण्यास मदत झाली आहे.
विघ्नेश पुथूरने अद्याप केरळ क्रिकेट संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळलेले नाही. तसेच, तो वरिष्ठ संघाचा भाग नाही. केरळ क्रिकेट लीगच्या पहिल्या हंगामात तो अॅलेप्पी रिपल्स संघाचा भाग होता आणि त्याने सामन्यात दोन विकेट घेऊन मुंबई इंडियन्सच्या स्काउट्सचे लक्ष वेधून घेतले, त्यानंतर एमआयने त्याला ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर संघात करारबद्ध केले. याशिवाय, एमआयने विघ्नेशला SA20 लीगसाठी दक्षिण आफ्रिकेला पाठवले, त्या दरम्यान त्याचा नेट बॉलर म्हणून वापर करण्यात आला, जिथे विघ्नेशने उत्कृष्ट गोलंदाजी केली.