पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई आणि जम्मू आणि काश्मीर यांच्यात रणजी ट्रॉफी सामना खेळला जात आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर होत्या. तो जवळजवळ 10 वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसत आहे. कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही धावा काढण्यासाठी संघर्ष करत आहे. अशातच तो धावांच्या शोधात तब्बल 10 वर्षांनी रणजी सामना खेळण्यास मैदानात उतरला. परंतु इथेही त्याची अवस्था वाईट दिसली. जम्मू आणि काश्मीरसारख्या छोट्या संघाविरुद्ध मुंबईकडून तो 19 चेंडूंचा सामना करून फक्त 3 धावांवर बाद झाला. रोहितला स्वस्तात बाद करण्याचे काम जम्मू आणि काश्मीरचा 6 फूट 4 इंच उंचीचा गोलंदाज उमर नझीर मीरने केले. या कामगिरीने जम्मू आणि काश्मीरचा हा गोलंदाज निश्चितच प्रसिद्ध झोतात आला आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी असणा-या 31 वर्षीय उमर नझीर मीरने शानदार गोलंदाजी केली. मुंबईत खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या सहाव्या षटकात त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले. ही विकेट तो कधीही विसरणार नाही.
मुंबई संघाकडून खेळणा-या यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे या सारखे स्टार खेळाडू कशी कामगिरी करतात याचीही सर्वांना उत्सुकता होती. पण त्यांनीही निराशा केली. उमर नझीर मीर रोहित शर्माला बाद करून थांबला नाही. त्यानंतर त्याने अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनाही पायचीत पकडले आणि मुंबईच्या फलंदाजीचा कणा मोडला.
3 नोव्हेंबर 1993 रोजी पुलवामा येथे जन्मलेला उमर नझीर मीर जम्मू आणि काश्मीरकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने 2013 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने 57 सामन्यांमध्ये 29.12 च्या सरासरीने 138 विकेट्स घेतल्या आहेत. रणजीमध्ये सर्व्हिसेसविरुद्ध 53 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 54 विकेट्स आहेत तर टी-20 मध्ये उमर नझीरने 32 विकेट्स घेतल्या आहेत. उमर नझीरचा 2018-19 देवधर ट्रॉफीसाठी ‘इंडिया सी’ संघात समावेश करण्यात आला होता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, मुंबईचा संपूर्ण संघ पहिल्या डावात फक्त 120 धावांवर ऑलआउट झाला. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 51 धावा केल्या. उमर नझीरने 11 षटकांत 41 धावा देत 4 बळी घेतले.