Who Is Amol Muzumdar Coach Of Indian Womens Cricket Team
मुंबई : रमेश पोवारची मुख्य प्रशिक्षकपदावरून तडकाफडकी झालेली गच्छंती... 10 महिने पूर्ण वेळ मुख्य प्रशिक्षकविना खेळणाऱ्या महिला क्रिकेट संघाची जबाबदारी मुंबईकडून खेळलेल्या अमोल मुझुमदारकडे सोपवण्यात आली... प्रथम श्रेणी गाजवणारा पण आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नसलेल्या खेळाडूची महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण रविवारी नवी मुंबईतल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर विश्वचषक उंचावणाऱ्या टीम इंडियाकडे बघितल्यावर शंका उपस्थित करणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळालं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने मैदान गाजवत विश्वचषक जिंकलं असलं तरी मैदानाबाहेर याची आखणी केली होती ती मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी.
रविवारी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर महिला विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी दिमाखदार विजय मिळवला असून 1983, 2011 नंतर भारताने पुन्हा एकदा विश्वषचकावर नाव कोरलं. तर महिला संघाने पहिल्यांदाच विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीचं देशभरातून कौतुक होत असतानाच याचं श्रेय अमोल मुझुमदार यांनाही दिले जात आहे. 11 नोव्हेंबर 1974 रोजी जन्म झालेल्या अमोल मुझुमदार यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल 11 हजारपेक्षा धावा चोपल्या आहेत. 21 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत अमोल मुझुमदार यांनी 30 शतकंही ठोकली आहेत. प्रथम श्रेणीत मुंबई, आसाम आणि आंध्र प्रदेश या संघांकडून ते खेळले आहेत.
टीम इंडियापूर्वी अमोल मुझुमदार यांनी कोणत्या संघांना प्रशिक्षण दिलं आहे?
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड होण्यापूर्वी अमोल मुझुमदार हे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक होते. याशिवाय 2019 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते. तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.
अमोल मुझुमदार यांनी कशी तयारी केली?
सराव, नियोजन आणि अंमलबजावणी... या तीन गोष्टींवर अमोल मुझुमदार यांनी लक्षकेंद्रित केले. विश्वचषकांमधील सुरूवातीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. संघनिवडीपासून खेळाडूंच्या कामगिरीपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित झाले. पण मैदानात मुंबईचा ‘खडूस’ खेळाडू म्हणून ओळखले जाणारे अमोल शांतपणे टीमकडून तयारी करून घेत होते. संघाला उपदेशाचे डोस देण्याऐवजी त्याने खेळाडूंना त्यांच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित ठेवायला सांगितले. ड्रेसिंग रुममध्ये सर्वांची मतं ऐकून घेतली जायची. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून टीम इंडिया आज जगज्जेता झाली असून संघातील खेळाडूही विजयाचे श्रेय अमोल यांना देत आहेत.
शांत पण धाडसी निर्णय घेणारा प्रशिक्षक
संपूर्ण विश्वचषकात अमोल यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. नवोदित खेळाडूंना संघात स्थान दिले. जेमिमा रॉड्रिग्जला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती देणं असे निर्णय त्यांनी घेतले. प्रत्येक खेळाडूची क्षमता लक्षात घेणं, कठीण परिस्थितीतही संयम ढळू न देणं यामुळेच खेळाडूंनीही त्यांच्यावर विश्वास दाखवला.