मुंबई : वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाणारे सर गारफिल्ड (गॅरी) सोबर्स यांचे शुक्रवारी, १७ जुलै रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. येत्या २८ जुलै रोजी ते आपला ९० वा वाढदिवस साजरा करणार होते, मात्र त्याआधीच अवघ्या ११ दिवसांपूर्वी या महान खेळाडूने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचा मुलगा डॅनियल सोबर्स यांनी दुजोरा दिला असून, या बातमीमुळे संपूर्ण क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.
सर गॅरी सोबर्स यांनी १९५४ ते १९७४ या दोन दशकांच्या प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत वेस्ट इंडिज संघासाठी अतुलनीय योगदान दिले. आपल्या उत्कृष्ट फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले.
त्यांनी वेस्ट इंडिजसाठी ९३ कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये ५७.७८ च्या प्रभावी सरासरीने ८,०३२ धावांचा डोंगर उभा केला. या प्रवासात त्यांच्या बॅटमधून २६ शतके आणि ३० अर्धशतके झळकली. केवळ फलंदाजीतच नव्हे, तर गोलंदाजीतही आपली छाप सोडत त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये २३५ बळींची नोंद केली. मैदानावर चपळ क्षेत्ररक्षण करत त्यांनी तब्बल १०९ झेलही टिपले. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर ते केवळ एकच एकदिवसीय सामना खेळले.
त्यांच्या कारकिर्दीतील अनेक विक्रम आजही सुवर्णअक्षरांनी कोरले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. १९५८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना सोबर्स यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आणि त्याचे रूपांतर त्यांनी नाबाद ३६५ धावांच्या ऐतिहासिक खेळीत केले.
कसोटी क्रिकेटच्या एका डावातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा हा विश्वविक्रम पुढील ३६ वर्षे अबाधित राहिला, जो अखेर १९९४ मध्ये वेस्ट इंडिजच्याच ब्रायन लारा याने मोडला. याशिवाय, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सलग सहा षटकार मारण्याचा ऐतिहासिक पराक्रम करणारे ते जगातील पहिले फलंदाज ठरले होते. कार्डिफ येथील काउंटी चॅम्पियनशिपच्या एका सामन्यात त्यांनी हा अनोखा विक्रम रचला होता.
२८ जुलै १९३६ रोजी बार्बाडोसच्या सेंट मायकेल येथे जन्मलेल्या गॅरी सोबर्स यांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी, १९५२-५३ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांच्यातील असामान्य प्रतिभा निवड समितीने अचूक हेरली आणि १९५४ मध्ये त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. डावखुरे फलंदाज असलेले सोबर्स एकाच वेळी जागतिक दर्जाचे फलंदाज, घातक वेगवान गोलंदाज, उत्कृष्ट फिरकीपटू आणि चपळ क्षेत्ररक्षक होते.
गरजेनुसार मध्यमगती तसेच फिरकी गोलंदाजी करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. त्यांच्या ३८३ प्रथम श्रेणी सामन्यांच्या भव्य कारकिर्दीत त्यांनी २८,३१४ धावा केल्या आणि १,०४३ बळी घेतले. कारकिर्दीच्या उत्तरार्धात ते साऊथ ऑस्ट्रेलिया आणि नॉटिंगहॅमशायर या संघांसाठीही खेळले. तसेच, १९६५ ते १९७२ या काळात त्यांनी ३९ कसोटी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज संघाचे यशस्वी नेतृत्वही केले.
या महान अष्टपैलू खेळाडूच्या निधनाबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 'एक्स' या समाजमाध्यमावर पोस्ट करत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "सर गारफिल्ड सोबर्स यांच्या निधनाने बीसीसीआयला अतिशय दुःख झाले आहे. ते या खेळाचे खरे 'आयकॉन' आणि क्रिकेट जगतातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होते. कॅरिबियन क्रिकेटमधील त्यांची अतुलनीय कामगिरी सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि सर्व क्रीडाप्रेमींना सांत्वना," अशा शब्दांत बीसीसीआयने त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या जाण्याने क्रिकेटच्या इतिहासातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे.