स्पोर्ट्स

Bangladesh Cricket Controversy : टी-२० विश्वचषकावरून बांगलादेशात रणकंदन; खेळाडूंचे मौन सुटले, म्हणाले – ‘आमचा कोणी वाली नाही’

T20 World Cup 2026 Bangladesh controversy : बोर्ड आणि सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर

रणजित गायकवाड

ढाका : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत सहभागी न होण्यावरून बांगलादेश क्रिकेटमध्ये सध्या प्रचंड खळबळ माजली आहे. विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर खेळाडूंनी केलेल्या धक्कादायक गौप्यस्फोटांमुळे बोर्ड आणि सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

सल्लागारांच्या 'यू-टर्न'मुळे वादाला तोंड

टी-२० विश्वचषक २०२६ मधून बांगलादेश बाहेर पडल्यानंतर वादाचे वादळ निर्माण झाले आहे. सुरुवातीला, भारतामध्ये जाण्यास नकार देण्याचा निर्णय सुरक्षा कारणास्तव सरकारने घेतल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी आपल्या वक्तव्यातून कोलांटउडी घेतल्याने वादात ठिणगी पडली आहे.

या पूर्वीच्या वेळपत्रकानुसार बांगलादेशचे वर्ल्डकप सामने भारतात आयोजित करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या क्रिकेट बोर्डाने भारतात संघ पाठवण्यास नकार दिला. परिणामी, आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.

२२ जानेवारी रोजी नजरुल यांनी स्पष्ट केले होते की, सुरक्षेच्या कारणास्तव विश्वचषक न खेळण्याचा निर्णय सरकारचा आहे. परंतु, नुकत्याच दिलेल्या एका निवेदनात त्यांनी म्हटले की, ‘हा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि खेळाडूंनी घेतला होता. देशाची सुरक्षा आणि सन्मानासाठी त्यांनी दिलेला हा त्याग एक आदर्श म्हणून लक्षात ठेवला जाईल.’

खेळाडूंचा संताप: ‘आम्ही हतबल आहोत’

नजरुल यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अनेक खेळाडू भारतात जाऊन खेळण्याच्या बाजूने होते, कारण विश्वचषकात सहभागी न झाल्यामुळे आयसीसीकडून मिळणारा महसूल आणि भविष्यातील निर्बंधांची टांगती तलवार त्यांच्यावर होती.

एका खेळाडूने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली की, ‘हे ऐकून खूप विचित्र वाटतेय.’ तर दुसऱ्या एका खेळाडूने हतबलता व्यक्त करताना म्हटले की, ‘तुम्ही बोर्डाच्या पदाधिका-यांचे विधान ऐकलेच असेल. आता आम्ही काय बोलणार? आमचा कोणीही वाली नाही. आम्ही पूर्णपणे हतबल आहोत. या निर्णयामध्ये आमचा कोणताही सहभाग नव्हता.’

असे कळते की, बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या बैठकीत खेळाडूंच्या मतांकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. अशा परिस्थितीत सर्व खापर बोर्ड आणि खेळाडूंवर फोडणे हे अधिक धक्कादायक मानले जात आहे.

टीकेनंतर नजरुल यांची सारवासारव

सर्व स्तरांतून होणाऱ्या टीकेनंतर नजरुल यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी लिहिले की, ‘सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय सरकारचाच होता आणि मी आजही त्याच भूमिकेवर ठाम आहे. पत्रकार परिषदेत मी माझे म्हणणे योग्य पद्धतीने मांडू शकलो नाही.’

मात्र, बीसीबीच्या अंतर्गत गोटातही यावरून नाराजी आहे. बोर्डाच्या एका संचालकाने स्पष्टपणे सांगितले की, ‘पहिले ते काहीतरी वेगळे बोलले आणि आता भलतेच सांगत आहेत. संघ न पाठवण्याची घोषणा त्यांनी स्वतः केली होती. हा बीसीबी किंवा खेळाडूंचा निर्णय नसल्यामुळे त्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT