नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होवो अथवा न होवो, ‘खेळ थांबता कामा नये,’ असे स्पष्ट मत पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने व्यक्त केले. अलीकडील बर्याच कालावधीपासून भारत-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय क्रिकेट जवळपास ठप्प झाले असून त्या पार्श्वभूमीवर अक्रम बोलत होता.
‘स्टिक विथ क्रिकेट पॉडकास्ट’वर बोलताना वसीम अक्रम म्हणाला, आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे आणि त्यावर काही प्रमाणात टीकाही होत आहे. पण, पाकिस्तानात फारशा प्रतिक्रिया उमटलेल्या नाहीत. आम्ही खेळलो किंवा नाही खेळलो, तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. खेळ सुरू राहिला पाहिजे. यावेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात भविष्यात कसोटी मालिका होण्याची आशाही व्यक्त केली. भविष्यात लवकरच भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका व्हावी, अशी माझी इच्छा आहे, असे अक्रमने पुढे नमूद केले.
राजकारण बाजूला ठेवूया, मी राजकारणी नाही. त्यांना त्यांच्या देशाबद्दल आत्मीयता आहे आणि आम्हाला आमच्या देशाबद्दल आत्मीयता आहे. आपण एकमेकांवर वैयक्तिक टीका करणे टाळायला हवे. अर्थात, हे बोलणे सोपे आहे, पण करणे कठीण आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.