पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशियनच्या मैदानावर खेळवला जात आहे. यातील पहिला दिवस हा भारतीय संघाच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी भारताच्या फिरकी गोलंदाजीच्या नावे राहिला. यामध्ये तीन वर्षानंतर कसोटी संघामध्ये पुनरागमन करणाऱ्या वॉशिंग्टनने 'सुंदर' गोंलदाजी करत न्यूझीलंडचे सात खेळाडू तंबूत परत पाठवले. त्यामध्ये पाच खेळाडू त्रिफळाचीत केले हे विशेष.
न्यूझीलंडच्या संघाला एकट्याने नेस्तनाबूत केल्यानंतर बोलताना सुंदर म्हणाला, मी या खेळीचे श्रेय तमिळनाडू रणजी क्रिकेटला देईन. रणजी खेळताना मला अधिक मॅच सराव करताना मिळाला. तिथे केलेल्या सरावचा फायदा मला या कसोटी सामन्यामध्ये झाला. त्यामुळे मी माझी कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करु शकलो. यावर्षी तमिळनाडूकडून क्रिकेट खेळताना दिल्ली संघाच्या विरोधात सुंदरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 152 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर गोंलदाजीमध्ये 6 बळी घेतले होते. या प्रदर्शनाला लक्षात घेऊन प्रमुख कोच गौतम गंभीर याने दोन कसोटीमध्ये सुंदरचा सहभाग करुन घेतला. गंभीरचा हा निर्णय भारताच्या हिताचा ठरला.